पुणे : नवरात्रीतील अष्टमीच्या निमित्ताने पुण्यातील कोथरुडमधील एरंडवण्यामधे एखंडे कुटुंबीयांकडून पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पूजेमध्ये बोकडाचा बळी दिला जाणार होता. मात्र त्याला काही प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि हे प्राणीमित्र थेट एखंडे यांच्या घरात शिरले आणि त्यांनी पूजा बंद पाडली.

पूजा बंद पाडत पुजेचं साहित्यही विस्कटल्याचा आरोप एखंडे कुटुंबाने केलाय. या दरम्यान धक्काबुक्की देखील झाली. त्यानंतर प्रकरण अलंकार पोलीस स्टेशनला पोहचलं. बळी दिलेलं बोकडही पोलीस स्टेशनला आणण्यात आलं. त्यानंतर मनसेचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनमध्ये जमा झाले.

दोन्ही बाजूंकडून एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एखंडे यांच्या तक्रारीवरून पीपल फॉर अॅनिमल या संघटनेच्या रिना रॉय यांच्यासह त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांवर पुजेत अडथळा आणल्याचा आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर रिना रॉय यांनी 50 हजार रुपये मागितल्याचीही तक्रार देण्यात आली आहे.

रिना रॉय यांच्या तक्रारीवरून एखंडे यांच्याविरोधात अॅनिमल क्रुएलिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान बळी दिलेले बोकड पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आणि त्यानंतर ते पोस्ट मॉर्टेमसाठी पाठवण्यात आलं.