पुणे : सैन्य दलात होणाऱ्या शिपाई भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या सात जणांना पुणे पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. या प्रकरणी आता लष्करातील एका वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली. तामिळनाडू येथून ही अटक केल्याची माहिती समोर येत आहे.


या लष्करी अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी तामिळनाडू येथून अटक केल्यानंतर रविवारी पुण्यात आणले. पेपर लीक करण्यामध्ये या अधिकाऱ्याचा महत्त्वाचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही मोठ्या  अधिकार्‍यांचा सहभाग असल्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे. या वरिष्ठ अधिकाऱ्याला आज पुणे पोलीस न्यायालयासमोर हजर करतील. पुणे पोलिसांच्या काही स्पेशल टीम्स या गुन्ह्याचा तपास करत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात आलं आहे. या प्रकरणात लवकरच महत्त्वाची माहिती समोर येईल असं देखील  पुणे पोलिसांचं म्हणणं आहे.


काय आहे प्रकरण?


याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 28 फेब्रुवारी रोजी पुण्यासह भारतभरातील 40 परीक्षा केंद्रावर रिलेशन आर्मी शिपाई भरतीची परीक्षा होणार होती. या परीक्षेला देशभरातून तीस हजार विद्यार्थी बसले होते. दरम्यान या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडून काही व्यक्ती ही प्रश्नपत्रिका सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना लाखो रुपये किमतीने विकणार असल्याची माहिती सदर्न कमांड मिलीटरी इंटेलिजन्सच्या लायझन युनिटला मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणी दोन ठिकाणी छापेमारी करत सात जणांना अटकही केली होती.  हा पेपर फुटल्याचे लक्षात आल्यानंतर संपूर्ण भारतात होणारी सैन्यदलाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे.