पुणे : धो-धो पाऊस कोसळायला लागला की मुंबई-पुण्यातील पर्यटकांना खुणावणारा टुरिस्ट स्पॉट म्हणजे लोणावळ्याचा भुशी डॅम. गेला आठवडाभर सतत कोसळणाऱ्या पावसानं यंदाही भुशी डॅम भरभरुन वाहू लागलाय. मात्र तिथे सेल्फी घेण्याचा मोह जीवावरही बेतू शकतो.
भुशी तलावातून येणारे पाण्याचे लोटच्या लोट अंगावर झेलण्यासाठी शेकडो पर्यटकांची पावलं आपसूकच वळायला लागली आहेत. मात्र पाण्याचा प्रवाह इतका जास्त आहे की डॅमखालील पायऱ्यांवर बसणंही अशक्य बनलंय. असं असलं तरी पर्यटकांच्या उत्साहात जराही खंड पडलेला नाही.
भुशी डॅममध्ये मनसोक्त भिजताना तरुणाईला सेल्फीचा मोहही आवरता येत नाहीय. मात्र सेल्फी काढताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. निसरड्या जागी बसून सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरुन अपघात होण्याची अधिक असते. त्यामुळे अशा गोष्टी टाळण्याचं आवाहन पर्यटकांना करण्यात आलंय.
फक्त भुशी डॅमच नाही, तर पावसाळ्याच्या दिवसात अनेक धबधब्यांमध्ये भिजताना सेल्फी क्लिक केले जातात. सोशल मीडियावर काही लाईक्स मिळवण्याच्या हव्यासातून सेल्फी काढण्यासाठी काही जण जीव धोक्यात घालतात आणि हाच अट्टाहास जीवावर बेतू शकतो. त्यामुळे मजा करताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.