पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबरला झारखंड राज्यातील जमशेदपूर येथील कार्यक्रमातून 10 नव्या वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर-सिकंदराबाद आणि पुणे-हुबळी (Pune Hubli) या एक्स्प्रेस सुरु होणार असल्याची माहिती होती. मात्र, पुणे- हुबळी एक्स्प्रेस वंदे भारत एक्स्प्रेससंदर्भात बदल करण्यात आले आहेत. पुणे हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसची ट्रायल रन आता 16 सप्टेंबरला होईल.  पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस धावणार होती. त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. पुणे- हुबळी या मार्गावर तीन दिवस आणि पुणे-कोल्हापूर (Pune Kolhapur Vande Bharat Express) या मार्गावर तीन दिवस वंदे भारत एक्स्प्रेस चालवली जाणार आहे. यामुळं पश्चिम महाराष्ट्रातील प्रामुख्यानं कोल्हापूरमधील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मिरज रेल्वे यूजर्स या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत पोस्ट करण्यात आलेली आहे. रेल्वेकडून यासंदर्भात अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 


पुणे- हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस तीन दिवस तर, पुणे कोल्हापूर या मार्गावर ही एक्स्प्रेस तीन दिवस धावेल. पुण्याहून हुबळीसाठी सुटणारी वंदे भारत एक्स्प्रेस सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, धारवाड या स्थानकांवर थांबेल.पुणे आणि हुबळी या दोन्ही शहरांमधील अंतर 558 किलोमीटर आहे. पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसला 8 कोच असतील. 


पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेसचं संभाव्य वेळापत्रक


पुणे कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेसला (20763) पुणे, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज  हे थांबे असतील. कोल्हापूरहून ही एक्स्प्रेस सकाळी 8.15 वाजता सुटेल, असं प्रस्तावित करण्यात आलं आहे. मिरजेत 9.00 वाजता, सांगलीत 9.15,किर्लोस्करवाडीत 9.42, कराडला 10.07 वाजता, सातारा येथे 10.47 वाजता असेल. तर, पुण्यात दीड वाजता पोहोचेल, अशी वेळ प्रस्तावित करण्यात आली आहे. 


पुण्याहून ही गाडी (20674) कोल्हापूरसाठी दुपारी 2. 15 वाजता सुटेल, साताऱ्यात 4.37 वाजता, कराडला 5.25, किर्लोस्करवाडीत 5.50, सांगलीत 6.18, मिरजला 6.40 तर कोल्हापूरमध्ये 7.40 वाजता पोहोचेल.


 
पुणे-मिरज-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसचं संभाव्य वेळापत्रक


हुबळीतून पुण्यासाठी वंदे भारत एक्स्प्रेस (20669) पहाटे पाच वाजता सुटेल. त्यानंतर पहिलं स्थानक धारवाड असेल. धारवाडला ती 5.15 पोहोचेल. तिथून  5.17 वाजता सुटेल. बेळगावला स्थानकावर ही एक्स्प्रेस 6.55 वाजता पोहोचेल. तिथं पाच मिनिटांचा थांबा असेल. बेळगावहून ही एक्स्प्रेस मिरजसाठी 7 वाजता पोहोचेल. मिरजला ही एक्स्प्रेस 9.15 वाजता पोहोचेल. मिरज स्थानकावर 5 मिनिटं थांबल्यानंतर ती पुढे रवाना होईल. सांगलीत ही गाडी 9.30 मिनिटांनी पोहोचेल. या ठिकाणी दोन मिनिटांचा थांबा असेल. त्यानंतर सातारा रेल्वे स्थानकात ही गाडी 10.35 वाजता पोहोचेल. या ठिकाणी देखील दोन मिनिटं एक्स्प्रेस थांबेल. त्यानंतर ती पुढे  पुणे जंक्शन येथे दुपारी दीड वाजता पोहोचेल. 


पुण्याहून हुबळीसाठी वंदे भारत एक्स्प्रेस (20670) दुपारी 2.15 वाजता सुटेल. साताऱ्यात ती 4 वाजून 8 मिनिटांनी पोहोचेल. सांगलीत 6.10 वाजता, मिरजला, 18.45 वाजता पोहोचेल. बेळगावला 8 वाजून 35 मिनिटांनी तर धारवाडला 10. 20  वाजता पोहोचेल. हुबळीत  ही वंदे भारत एक्स्प्रेस 22.45 वाजता पोहोचेल. पुणे हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवासाचा वेळ साडे आठ तास आहे. या एक्स्प्रेसचा सरासरी वेग 65 किमी असेल. 






इतर बातम्या :


Layoffs : 'या' कंपनीचा मोठा निर्णय! तब्बल 1800 कर्मचाऱ्यांना दिला नारळ, नेमका का घेतला निर्णय?