पिंपरी चिंचवड : आळंदी नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्या हत्येचं गूढ उकलण्याची चिन्हं आहेत. दोन महिन्यांपूर्वी वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या भांडणातून मावसभावानेच कांबळेंची हत्या केल्याचा संशय आहे.


वाढदिवसाच्या पार्टीतील भांडणामुळे हे हत्या झाल्याची फिर्याद कृष्णा राजकुमार घोलप यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी देहूफाटा भागात राहणारा कांबळेंचा मावसभाऊ अजय संजय मेटकरीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पिंपरीत भाजप नगरसेवकाची हत्या

दोन महिन्यांपूर्वी बालाजी कांबळे देहू फाटा येथील काळेवाडी झोपडपट्टीत आकाश जाधव आणि शुभम कांबळे याच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. त्यावेळी अजय मेटकरी याने दारुच्या नशेत बालाजी कांबळे यांना शिवीगाळ केली होती. यावेळी दोघांमध्ये झटपट झाल्याचंही म्हटलं जातं.

भांडणानंतर बघून घेईन, अशी धमकी अजय मेटकरीने कांबळेंना अनेकदा दिली होती. त्यामुळे त्यानेच भांडणाचा राग मनात धरुन नगरसेवक बालाजी कांबळेंची हत्या केली, अशी फिर्याद घोलप यांनी दिघी पोलीस ठाण्यात दिली आहे. मात्र दिघी पोलिस अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण?

आळंदीतील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर वडमुखवाडीमध्ये धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा हल्ला झाला होता.

बालाजी कांबळे आळंदी नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक होते. ते पहिल्यांदाच नगरसेवकपदी निवडून आले होते. त्यांचा बांधकामाचा छोटेखानी व्यवसाय होता.