मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे धडाडीचा निर्णय घेणारे आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेते म्हणून सर्वपरिचीत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार यांच्यातील संवेदनशील माणसाचे दर्शन घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेदरम्यान अजित पवार कधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधत आहेत, कधी महिला भगिनींच्या रिक्षातून प्रवास करत आहेत, तर कधी वाटेतच थांबून महिला भगिनींसोबत सेल्फीही घेत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसारही त्यांच्याकडून केला जात आहे. नुकतेच पुणे-पिंपरी येथील दौऱ्यात अजित पवारांनी एका दिव्यांग भगिनीशी आपुलकीने संवाद साधला. दोन हात नसतानाही तिने आपल्या हातांनी मोबाईल नंबर डायल केल्यानंतर अजित पवारांनी तिचं कौतुक करत तिला आशीर्वाद दिला.


अजित पवरांनी आजही आपल्या भाषणात बोलताना, हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्व समाज घटकांचा विचार करणारं, हे सरकार आहे. म्हणूनच जनतेकरिता आम्ही वेगवेगळ्या चांगल्या योजना आणल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला माझ्या माय-माऊली उत्तम प्रतिसाद देत आहेत. या योजनेतील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी, जनतेकडून एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी आम्हाला पाठबळ द्यावं, पुन्हा संधी द्यावी. पुढची पाच वर्षे देखील या योजनेंतर्गत बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याचं काम हे सरकार करेल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. तर, शुक्रवारी एका लाडक्या बहिणीच्या डोक्यावर हात ठेऊन दिला घर देण्याचं आश्वासनही दिलं. 


शुक्रवारी पिंपरीमध्ये जन सन्मान यात्रेदरम्यान एका धाडसी भगिनीने आपल्या लहान मुलासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. एका अपघातात आपले दोन्ही हात गमावूनही ती भगिनी हार न मानता खंबीरपणे लढत आहे. आपला भाऊ म्हणून तिने दादांना हक्काने घर मिळवून देण्याची विनंती केली. दादांनीही तात्काळ तिला घर मिळवून देण्याचे वचन दिले. या भगिनीने आपले हात गमावले असले तरी, ती अजूनही सर्व घरकाम स्वतःच करते. अजित पवार यांच्यासमवेतच्या भेटीदरम्यान, तिने स्वतः मोबाईल फोन कसा वापरते हेही उपमुख्यमंत्र्यांन दाखवले. तसेच, मी घरातील सर्व कामे करते, स्वयंपाक करते, चपाती पीठ मळून घेते, कपडे-भांडी देखील धुते, असे तिने म्हटले. तसेच, अजित पवारांना मोबाईलवरुन नंबर डायल करुन दाखवलं. त्यानंतर, अजित पवारांनी तिच्यासमोर हात जोडून, नंतर तिच्या डोक्यावर हात ठेवला. वा गं माझी मैना... असे म्हणत तिच्या कर्तबगारीला दाद दिली. तसेच, या महिलेच्या मोबाईलमध्ये अधिकाऱ्याला नंबर सेव्ह करुन देण्यासही बजावले. 




दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यावरच, या लाडक्या बहिणीला हक्काचं घर देण्याचं आश्वासनही अजित पवारांनी दिलं.


हेही वाचा


घरासाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; सुलभतेनं अर्ज कसा करावा, यासाठी म्हाडाचा वेबिनार; कुठं पाहता येणार