Ajit Pawar : राजकारणापासून कुटुंब कायम अलिप्त ठेवलेल्या पवार कुटुंबियांमध्ये कधी नवी ते यावेळी राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी फोडल्यानंतर प्रथमच पवार कुटुंबीय निवडणुकीला सामोरे जात आहे. बारामती लोकसभेसाठी थेट सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना रंगला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी दोन्ही बाजूकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.
वाद मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी
शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व राजकीय विरोधकांच्या भेठीगाठी सुरु केल्या आहेत. आता अजित पवार यांनी सुद्धा प्रतिडावास सुरुवात केली आहे. इंदापूर तालुक्यातील हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील वाद राजकीय सर्वश्रुत आहे. हर्षवर्धन पाटलांकडून अजित पवारांवर आणि अजित पवारांकडून हर्षवर्धन पाटलांवर सातत्याने टीका करण्यात आली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मध्यस्थीने दोन्ही नेते राजकीय वाद मिटवून एकत्रित आले आहेत. आता यामध्ये आणखी एक पाऊल टाकलं जाणार आहे.
19 एप्रिल रोजी अजित पवार सहकुटुंबीय स्नेहभोजन करणार
उपमुख्यमंत्री अजित पवार, पत्नी सुनेत्रा पवारांसह त्यांची दोन मुले जय आणि पार्थ भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या घरी भेट देणार आहेत. या भेटीचा मुहूर्त सुद्धा ठरला असून 19 एप्रिल रोजी संध्याकाळी हर्षवर्धन पाटील यांच्या घरी अजित पवार सहकुटुंबीय स्नेहभोजन करणार आहेत. त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांशी सुद्धा संवाद साधणार आहेत. त्यामुळे या मनोमिलनातून राजकीय वाद संपणार का? याकडे लक्ष आहे. फडणवीस यांनी समजूत काढल्यानंतरही हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. त्यामुळे दोन्ही नेते आता स्नेहभोजनानंतर एकदिलाने काम करणार का याकडे सुद्धा महायुतीसह नेत्यांचे लक्ष आहे.
अजित पवारांनी घेतली प्रेमसुख कटारियांची भेट
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी प्रेमसुख कटारिया यांची दौंडमधील निवासस्थानी घेतली होती. आज त्यांचीच भेट घेण्यासाठी अजित पवार पोहोचले. बारामती लोकसभेला सुनेत्रा पवार यांचा उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रेमसुख कटारिया यांची आणि अजित पवारांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. आज इंदापूर दौंडच्या दौऱ्यावर असताना अजित पवार त्यांच्या भेटीसाठी पोहोचले. यावेळी दौंडचे भाजप आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात देखील उपस्थित होते. प्रेमसुख कटारिया हे राहुल कुल यांचे निकटवर्तीय आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या