पुणे : पुणे शहरासाठी वाहतूक कोंडी काही नवीन नाही. जो पुण्यात गाडी चालवू शकतो, तो जगात कुठेही चालवू शकतो, असंही म्हटलं जातं. पुण्याच्या वाहतूककोंडीचा फटका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनाही बसला आहे. त्यामुळे त्यांच्यावर चक्क रिक्षानं प्रवास करण्याची वेळ आली.
पुण्यातल्या मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी अजित पवार पुण्यात आले होते. मात्र शनिवार असल्याने रस्त्यावर दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. त्यामुळेच पवारांनी चक्क रिक्षा पकडली आणि केसरीवाड्यात गेले.
कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवार मानाचा पाचवा गणपती असलेल्या केसरीवाड्यात दर्शनासाठी निघाले. त्यानंतर अप्पा बळवंत चौकात वाहतूक कोंडी झाल्यानं गाडीने जाणे त्यांना शक्य झाले नाही. त्यामुळे तात्काळ त्यांनी रिक्षाने जाण्याचा निर्णय घेतला.
अजित पवारांना रिक्षामधून उतरताना पाहून तिथे उपस्थित असलेले नागरिकही अवाक झाले. यावेळी रिक्षामध्ये अजित पवारांसोबत महापौर प्रशांत जगताप आणि सभागृह नेते शंकर केमसेसुद्धा होते.