Pune Ajit Pawar News:  सध्या सगळे भाजपचे (BJP) नेते बारामती (Baramati) दौरा करत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडले आणि बारामतीला आले, या बारामतीत धडका मारुन काय होणार आहे का?, असा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना विचारला आहे. गेल्यावेळेस माझ्या विरोधात निवडणूक लढवली त्याच्यासहित सगळ्यांच डिपॉझिट जप्त, अशा शब्दात त्यांनी टोलाही लगावला आहे. निर्मला सीतारमण या बारामतीचा दौरा करणार असल्याचं बोललं जातंय मात्र त्या कधी येणार माहिता नाही मात्र आल्या तर त्यांचं बारामतीत स्वागत करु, त्यांनी कधीही यावं, असंदेखील ते म्हणाले. 
 
मी माझ्या कामाची सुरुवात पहाटे लवकर उठून करतो. त्यामुळे सलग सातव्यांदा मला बारामतीची लोकं निवडून देत आहेत. लोकांनी मला निवडून दिलं आहे म्हणून मी काम करत असतो. त्यामुळे बारामतीकर मला लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून देतात. काही दिवस झाले अनेक नेते बारामतीला भेट देत आहे. महाराष्ट्रात कूठेही फिरण्याचा अधिकार सगळ्यांना आहे, असंदेखील ते म्हणाले.


जगात सगळ्यात मोठा असणारा देश भारत आहे. लोकसंख्या देखील आपली जास्त आहे. लोकसंख्या नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. जर दोनच मुलं असतील तर त्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण देता येतं तसंच त्यांचं भविष्यदेखील उज्वल करु शकतो. शिक्षणासाठी आम्हाला जे चांगलं करता आलं ते आम्ही कायम करण्याचा प्रयत्न करतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


महिलांना आरक्षण दिलं, सरपंच पदासाठी संधी दिली तर यांनी नवीन टुम काढली मी म्हटलं सरपंच थेट तर मुख्यमंत्री जनतेतून करा, त्यावेळी सगळ्यांची ताकद बघू मात्र हे सगळं सोयीनुसार होत आहे. दादा बॉडी एकाची आणि सरपंच एकाचा,असं लोक आम्हाला सांगतात. त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार करताना अनेक अडचणी निर्माण होतात, असंही ते म्हणाले.


सरकार स्थापन होऊन देखील आतापर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री नाही त्यामुळे सगळेच निर्णय अधिकारी घेऊ शकत नाही. त्यामुळे जनतेची कामं खोळंबली आहेत. अधिकाऱ्यांनादेखील कळत नाही सरकार किती दिवस चालेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेच राज्यासाठीचे सगळे निर्णय घेत आहेत. सध्या मंत्रिमंडळात 20 मंत्री आहेत परंतु पालकमंत्री नसल्यामुळे जिल्ह्याचे प्रश्न मार्गी लागत नाहीत. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यांना लवकरात लवकर पालमंत्र्यांची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.