अकोला: अजितदादांचं (Ajit Pawar) राजकारण हे सगळ्यांना माहिती आहे, ते शब्द पाळतात, शब्द फिरवत नाही, पाठीत खंजीर कोण खुपसला याचं उत्तर अंकिता पाटलांनी (Ankita Patil) द्यावं असं प्रत्युत्तर अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी दिलं. आपण महायुतीमध्ये एकत्रित आहोत, त्यामुळे खंजीर खुपसण्याची भाषा करून महायुतीत संभ्रम निर्माण होईल अशी भाषा करू नये असा सल्लाही मिटकरींनी अंकिता पाटलांना दिला. अंकिता पाटलांनी अजित पवारांवर आरोप केल्यानंतर अमोल मिटकरींनी त्यांना प्रत्युत्तर दिलं.


अजित पवारांनी आपल्याला तिनदा शब्द देऊनही पाठीत खंजीर खुपसला असा आरोप अंकिता पाटलांनी केला होता. आता विधानसभेला आमचं काम केल्यानंतरच आम्ही लोकसभेला तुम्हाला मदत करू असा इशाराही दिला होता. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू असतानाच अंकिता पाटलांनी दिलेल्या या इशाऱ्यामुळे अजित पवार गट नाराज झाल्याचं दिसतंय. त्यामुळे इंदापुरात अजित पवार गट आणि हर्षवर्धन पाटलांच्या गटामधील वादही वाढण्याची चिन्हं आहेत. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने अंकिता पाटलांना उत्तर दिलं आहे. 


काय म्हणाले अमोल मिटकरी?


अंकिता पाटील या दादांच्या मुलीच्या वयाच्या आहेत.तरुण मुलांनी राजकरणात आलं पाहिजे असं दादांच मत आहे. अंकिता पाटील जे बोलतायत ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. शेवटी त्यांचं वय लहान आहे. सध्या लोकसभेची चाचपणी सुरू आहे, त्यानंतर विधानसभा होईल. त्यामुळे सगळं वेळवर होईल. त्यावर राजकारणाची इतकी घाई का?


इंदापूर मतदारसंघाचा इतिहासात पाहता, गेल्या वेळच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवरील पक्षांसह जनतेनं राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा देत त्यांना संधी दिली. कुणी पाठीत खंजीर खुपसला, कोण शब्द देत होतं, कोण शब्द फिरवला हे इंदापूर आणि बारामतीकरांनं चांगलं माहिती आहे. अजित पवार हे शब्द देणारे नेते आहेत, ते शब्द पाळणारे नेते आहेत. 


अंकिता पाटील यांनी राजकरणात नक्की यावं, त्यांचं स्वागत आहे.पण आता आपण सगळे महायुतीत आहोत. त्यामुळे महायुतीत संभ्रम तयार होईल असं व्यक्तव्य आपण करून नये.


इंदापूरची जागा लढवण्यावर हर्षवर्धन पाटील गट ठाम


यंदा काहीही झालं तरीही इंदापूरची जागा लढवणारच असं भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन पाटलांनी म्हटलं आहे. या ठिकाणी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. त्यामुळे या जागेवरून आता महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


ही बातमी वाचा: