Ajit Pawar LIVE: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणेकरांना दिवाळीआधी मोठं गिफ्ट दिलं आहे. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पुणेकरांसाठी महत्वाची घोषणा केली. पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांचं आयोजन करण्यास परवानगी देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. दिवाळीनंतर थिएटर्स 100 टक्के क्षमतेनं सुरु करण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पुण्यातील ग्रामीण भागातील आठवडे बाजार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचं पवार यांनी सांगितलं.


त्यांनी सांगितलं की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल भविष्यात मेट्रोचे काम झाल्यानंतर वाहतूक कोंडी होउ नये यासाठी पाडला.  अनेक तंत्रांचा वापर करण्यात आलाय.  हे खरे आहे की नवीन काम करण्याची जबाबदारी असलेल्या टाटा कंपनीला काही अडचणी येतायत. पण दिवाळीनंतर हे  काम सुरु करण्यात येईल, असंही ते म्हणाले.  पुण्यातील जंबो कोविड सेंटर कायम ठेवायचे की काढून टाकायचे याचा निर्णय दिवाळीनंतर घेऊ, असंही ते म्हणाले. 


अजित पवारांचा विरोधकांना इशारा


जरंडेश्वर साखर कारखान्यावरून होणाऱ्या टीकेवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना कालच इशारा दिला होता. राज्यात केवळ जरंडेश्वर हा एकमेव कारखाना नाही. कोणते कारखाने कोणी कितीला विकत घेतले याची माहिती आपण पत्रकार परिषद घेऊन देऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. आपल्या नातेवाईकांची बदनामी केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. तर काहींकडून मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरुद्ध गरळ ओकली जातेय. मी बेईमान आहे की काय ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी बेईमानी कधी केली नाही, ते आमच्या रक्तात नाही, अशा शब्दात अजित पवारांनी इशारा काल दिला होता. 


पिक विमा कंपन्यांना  सज्जड दम


पिक विमा कंपन्यांना  उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar)यांनी काल सज्जड दम दिला आहे. अजित पवारांनी म्हटलं आहे की, राज्यात शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना पीक विमा देताना विमा कंपन्या शेतकऱ्यांशी अडेलतट्टूपणाने वागत असतील, तर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही, असं अजित पवार म्हणाले.



अजित पवार म्हणाले की, अतिवृष्टीमुळं पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं राज्यातील शेतकरी अडचणीत आहेत. हजारो कोटी रुपयांचे पीक विम्याचे पैसे राज्य सरकारने भरले आहेत. शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन व इतर शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे उघड्या डोळ्यांनी दिसतेय. त्यामुळे विमा कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी, असं अजित पवार यांनी सांगितलं. आम्ही वेडंवाकडं करा, असं काही सांगत नाही पण ज्या नुकसानीमुळे बळीराजाला पीक विमा मिळू शकतो तो मिळाला पाहिजे. तो त्यांचा अधिकार आहे, असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. 


अजित पवारांना वक्तव्याचा विसर! आधी मास्क घालण्यावरुन लेक्चर नंतर आमदारांच्या आग्रहाखातर मास्क काढून भाषण!