पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे कोरोना नियमांचं कटाक्षानं पालन करणारे नेते म्हणून ओळखले जातात. ते सार्वजनिक कार्यक्रमात मास्क घालणं, इतरांना घालायला सांगणं, सॅनिटायझर सोबत ठेवणं याबाबत ते सतर्क असतात. मात्र काल पुण्यात अजित दादांच्या सभेत कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याचं पाहायला मिळालं. मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त काल एक सभा झाली. या सभेला तुफान गर्दी झाली. पण ही सभा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाषणांनी गाजली. विशेष म्हणजे या सभेत आमदार सुनील शेळकेंनीच उपमुख्यमंत्री अजित पवारांना मास्क काढून भाषण करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे पहिल्यांदाच अजित पवारांनी विना मास्क भाषण केलं. पण त्यावरुन आता अजितदादांना त्यांच्याच मास्कबद्दलच्या वक्तव्याचा विसर पडला का? असा सवाल विचारला जातोय.


आधी काय म्हणाले होते अजित पवार
अजित पवार यांनी मावळच्या कार्यक्रमाच्या काही तास आधी लोणावळ्यातील कार्यक्रमात मास्क घालण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की,  पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड ठेवला होता. तेंव्हा पन्नास कोटी रुपये दंड आकरला गेला. इतका नियम झुगारला. आता हे जे सापडले त्यांचा आकडा आहे. न सापडलेले किती असतील, विचार करा. तर अशी वेळ पुन्हा येऊन देऊ नका. आम्ही खूप अभ्यासपूर्वक हे सांगतोय. कृपया मास्क काढून फिरू नका. मी तर हा मास्क फक्त जेवताना, पाणी पिताना आणि रात्री झोपतानाच काढतो. नाही तर मास्क काढतच नाही. त्याला काही इलाज नाही. कारण जो पर्यंत धोका आहे तो पर्यंत काळजी घेणं आपल्याच हातात आहे, असं अजित पवारांनी म्हटलं होतं.  बाबांनो जरा काळजी घ्या. इथं तर आत्ता एकाच्या तोंडावर मास्क दिसेना, बघा-बघा त्यांचा हा मास्क तोंडाखाली आहे. एकदा कोरोना झाला की निम्मा महिना तरी घरीच जातो. म्हणून जरा मास्क वापराच, असं अजित पवारांनी म्हटलं होतं. 


नंतर काय घडलं?
नंतर काही वेळानेच विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंच्या वाढदिवसानिमित्त पुढच्या कार्यक्रमासाठी अजित दादा मावळमध्ये पोहोचले. या कार्यक्रमात सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडालेला दिसला, अनेकांच्या तोंडाला मास्क नव्हता.  या कार्यक्रमात अजित दादा सगळे हट्ट पुरवले आता एकच हट्ट पुरवा, फक्त मास्क काढून बोला, अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळकेंनी केली आणि अजित पवार मास्क काढून भाषणाला उभे राहिले. पण दुपारी लोणावळ्यात मी फक्त जेवण करताना, पाणी पिताना आणि रात्री झोपताना मास्क काढतो,  असं म्हणणाऱ्या अजित पवारांना विसर पडला. असा प्रतिसाद मावळ तालुक्यात मला याआधी मिळाला नव्हता. पण आज तुम्ही इथं आलात हे पाहून आनंद झाला. इतिहासातील काही दाखले ही दिले, असंही ते म्हणाले.  


नंतर काय म्हणाले दादा
यानंतर अजित पवार म्हणाले की, मी कायमच मास्क घालून बोलायचो. या पट्ट्याने आज मास्क काढून बोलायची मागणी केली. मी मास्क काढणार नव्हतो. पण आता वाढदिवस असताना दादाने माझी एवढीशी इच्छा पूर्ण केली नाही. असं हा म्हणणार. म्हणून मास्क काढलं. पण  बाबांनो मास्क घाला, कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. ( तेवढ्यात खालून एक जण म्हणाला, दादा तिसरी लाट येत नाही) तुझ्या तोंडात गूळ-साखर, पण बाबा नुसतं असू म्हणू नकोस. किमान मास्क तरी घाल. मास्क घालून बोलला असता तर चाललं असतं.  पण हे सांगताना दादांनी मात्र मास्क घातला नव्हता.