बीड: बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात केली, या प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मागणी केली जात आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. आज पुण्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांसोबतच संतोष देशमुख यांचं कुटुंब देखील उपस्थित आहे. यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कौतुक करत अजित पवार खूप प्रांजळ मनाचा माणूस आहे, अजित पवार कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालणार नाहीत, अजित पवारांचं धनंजय मुंडे जवळ काय अडकलं आहे, असा सवाल त्यांनी भर सभेमध्ये उपस्थित केला आहे. त्याचबरोबर त्यांना मंत्री मंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केलीय.


अजितदादा तुझ्या पाया पडतो...! 


माझी आत्ताच विनंती आहे. पुणे जिथे काय होणे, अशा ऐतिहासिक शहरांमधून मी मागणी करतोय. मायबाप सरकारने, देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो, अजितदादा यांना विनंती करतो, त्याला मंत्रीमंडळात ठेवू नये. अजितदादा फार प्रांजळ मनाचा माणूस आहे. पाच वर्षाच्या लेकरासारखं अजित दादाचा हृदय आहे आणि तो कधीच चुकीच्या लोकांना पाठीशी घालत नाही. मी त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे मला माहिती आहे. मी काही लोकांना घेऊन गेलतो. त्यांना म्हटलं यांच्या बाबतीत फोन करा. अजितदादा तेव्हा मला म्हणाले हे चुकीचे वागणारे लोक आहेत. मी यांच्या चुकीच्या बाबतीत फोन करणार नाही. एक वेळा नाही, दोन वेळा नाही, तर तब्बल दहा वेळा हे माझ्या बाबतीत घडलं आहे. मी राष्ट्रवादी 2005 पासून 2017 पर्यंत होतो, जवळजवळ दहा-बारा वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो. त्यांच्याबरोबर मी काम केलं. अजितदादा असा नव्हता. अजितदादा मी तुमच्या पाया पडतो, तुझं काय अडकले रे यांच्यापाशी असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे 


मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल


अजित दादा तुमचं यांच्याकडे काय अडकले आहे. यांना बाहेर जाऊ दे, अरे बाबा सातपुडा सरकारी बंगल्यावर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली तर मी चॅलेंज देतो. राजकारण सोडून देईल. माझ्याकडे 300 गाईंचा गोठा आहे. 1000 गाईंचा गोठा करेल. दोन तीनशे म्हशी देखील आणेन. मी राजकारणात राहणार नाही, पण अजित पवार, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्ही सर्वांनी मिळून या गोष्टीचा छडा लावा. या गोष्टी जर खऱ्या असतील तर काही दिवस जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, तोपर्यंत त्याला बाहेर काढा. आमची मागणी आहे. सरकारच्या बाहेर त्यांना ठेवा. त्यांच्याकडून राजीनामा घ्यायचा नसेल तर त्यांना बिन खात्याचा मंत्री करा. सगळ्यात सोपं राजीनामा द्यायला सांगा. या देशांमध्ये लालबहादूर शास्त्री यांनी रेल्वेचा एक अपघात झाला म्हणून त्यांनी राजीनामा दिला. निलंगेकरांच्या मुलीचे मार्क मागे-पुढे केले मुख्यमंत्रीपद गमावू लागलं, आर आर पाटलांना एका शब्दामुळे घरी जावं लागलं, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तुमच्या सर्वांच्या पाया पडतो. तुम्हाला तुम्हाला विनंती करतो. याचा राजीनामा घ्या. इतकी चौकशी होऊ द्या, आमच्या लेकराला न्याय मिळू द्या, अशी मागणी यावेळी सुरेश धस यांनी केली आहे.


बीडचा हमास केला. बीडचा तालिबान केला. या लोकांचं वागणं बर नाही. अजित पवारांवर मी टीका केली नव्हती, का लावून घेत आहात. मी अकरा वर्ष त्यांच्यासोबत काम केलं. अजित पवारांना घेरा घातला. अजित दादा डोळे उघडून खाली बघा काय सुरू आहे ते, बारामती मतदारसंघातील तुमच्या विश्वासातली माणसे बीड जिल्ह्यात पाठवा म्हणजे सत्यता समोर येई, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.