Ajit Pawar On Lonavala : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या विधानमुळे आणि रोखठोक स्वभावासाठी नेहमीच चर्चेत असतात. अजित पवार यांच्या याच स्वभावाची प्रचिती आज आली. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत लोणावळा बकाल करणाऱ्यांना दम भरला असून सर्वांना नियम सारखे असल्याचा इशाराही दिला. ते पर्यटन विकासावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी लोणावळ्यातील परिस्थितीवर भाष्य केलं. अजित पवार म्हणाले की, 'पर्यटन विकास हे खर्चिक काम आहे, पण करायचं आहेच. लोणावळाकरांनो आपलं शहर चांगलं दिसेल, बकालपणा येणार नाही. लोकांना त्रास होणार नाही. गुंड, दहशत, दादागिरी होणार नाही. कायदा सुव्यवस्था चोख असेल. याची काळजी पालकमंत्री म्हणून मला, खासदार-आमदारांना, लोकप्रतिनिधी आणि पोलिसांना देखील घ्यावी लागेल. त्याबद्दल कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही. सत्तेत असला तरी चुकीचं वागू नका, कायदा हातात घेऊ नका. सर्वांना नियम सारखे आहेत.'
स्वागतावेळी झालेल्या गर्दीवर अजित पवारांची नाराजी
आज तुम्ही माझं स्वागत लै जंगी केलं. पण माझ्या भगिनी आणि मित्रांच्या तोंडावर मास्क दिसले नाहीत. बाबांनो असं करू नका, तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरू नका. प्लेग च्या साथीत लोकांची रांग लागली होती, नुसते मृतदेह दिसायचे असं मी ऐकलंय, तशी वेळ येऊ द्यायची नाहीये. तेंव्हा काळजी घ्या.
लोणावळा पर्यटनावर काय म्हणाले अजित पवार?
मी पण लोणावळ्यात अनेकदा आलोय. खासकरून उन्हाळ्यात तर यायचोच. खरं तर इथलं वातावरण खूप चांगलंय, इथे आल्यावर कोणी आजारी पडत नाही. आजारी असला तर इथं येऊन ठणठणीत बरा होतो.
जेवताना, पाणी पिताना आणि रात्री झोपतानाच मास्क काढतो - अजित पवार
पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड ठेवला होता. तेंव्हा पन्नास कोटी रुपये दंड आकरला गेला. इतका नियम झुगारला. आता हे जे सापडले त्यांचा आकडा आहे. न सापडलेले किती असतील, विचार करा. तर अशी वेळ पुन्हा येऊन देऊ नका. आम्ही खूप अभ्यासपूर्वक हे सांगतोय. कृपया मास्क काढून फिरू नका. मी तर हा मास्क फक्त जेवताना, पाणी पिताना आणि रात्री झोपतानाच काढतो. नाही तर मास्क काढतच नाही. त्याला काही इलाज नाही. कारण जो पर्यंत धोका आहे तो पर्यंत काळजी घेणं आपल्याच हातात आहे.
पर्यटन विकासावर काय म्हणाले?
महाबळेश्वर धर्तीवर लोणावळ्यात पर्यटनाचा विकास करायचं आहे. पण तुमची साथ असली तर तसं इथं ही आपण करुयात. एकविरा देवी बद्दल ठाकरे कुटुंबियांची मोठी श्रद्धा आहे. तिथं रोप वे करताना, मुख्यमंत्र्यांना यायचं आहे. आपल्याला त्यांना ही आमंत्रण द्यायचं आहे. महाबळेश्वर नंतर माथेरान आणि लोणावळ्याची ओळख आहे. त्यामुळं इथल्या तरुण-तरुणींसाठी उपजीविकेची साधन उपलब्ध व्हावीत. सुरक्षित वातावरण असावं, पर्यटकांची संख्या वाढावी आणि इथं आर्थिक सुलभता यावी. म्हणून तशा उपाययोजना उपलब्ध करूयात.
मास्कवरुन उपस्थितांना सुणावलं -
कोरोनाच्या काळात बिकट अवस्था झाली. पहिल्या लाटेवेळी सव्वा लाख कोटी रुपये तिजोरीत कमी आले. बरेच कर आले नाहीत. पूर्व पदावर सगळी परिस्थिती आणायचं चाललंय. पण बाबांनो जरा काळजी घ्या. इथं तर आत्ता एकाच्या तोंडावर मास्क दिसेना, बघा-बघा त्यांचा हा मास्क तोंडाखाली आहे. एकदा कोरोना झाला की निम्मा महिना तरी घरीच जातो. म्हणून जरा मास्क वापराच.