पुणे: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणखी 250 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेवर संधी न दिल्यामुळे पदाधिकाऱ्यांची नाराजी कायम असल्याचं दिसून येत आहे. पक्षाच्या विविध पदांवरुन राजीनामे देणाऱ्यांची संख्या आता 850 वर पोहोचली आहे. 


राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदासाठी मानकर यांची वर्णी लागावी, यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे मागणी केली होती. मात्र, मानकर यांना डावलण्यात आले, परिणामी पहिल्याच दिवशी 600 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यानंतर आता आणखी 250 जणांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 


विधान परिषदेवर संधी न दिल्याने दिपक मानकर यांच्यासह कार्यकर्ते नाराज 


दिपक मानकर यांना विधान परिषदेवर संधी मिळेल अशी त्यांच्यासह कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र, विधानपरिषदेवर संधी न मिळाल्याने दिपक मानकर यांच्या अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत रोष व्यक्त केला होता. त्यानंतर दिपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली होती. 


गेल्या 40 वर्षांपासून राजकीय आणि समाजिक जीवनात कार्य करत आहे. या संपूर्ण काळात राजकीय जीवनात अनेक पदं भूषवली आणि पदांना न्याय देण्याचं काम केलं. गेल्या दीड वर्षापूर्वी माझ्यावर पुणे शहर अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आणि त्या पदाला न्याय देऊन विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षासोबत जोडण्याचे काम केले आहे. त्याचबरोबर लोकसभेवेळी देखील त्यांनी मोठी मेहनत केल्याचे सांगितले. तर रुपाली चाकणकर यांना पुन्हा महिला आयोगाच्या अध्यक्षापदावर पुन्हा संधी देण्यात आली त्याबाबत देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर आज नाराज असलेले दिपक मानकर अजित पवारांच्या भेटीसाठी सकाळी पक्ष कार्यालयात दाखल झाले होते. 


अजित पवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता


राजीनामा सत्र आणि नाराजी या कारणांमुळे अजित पवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आज दीपक मानकर अजित पवारांना भेटण्यासाठी पोहोचले. अजित पवार येण्याआधीच दीपक मानकर पक्ष कार्यालयात हजर झाले होते. त्यानंतर रुपाली ठोंबरे देखील आज पक्ष कार्यालयात अजित पवारांची भेट घेणार आहेत. मानकर यांच्या कार्यकर्त्यांनी मानकरांना विधान परिषद मिळाली नाही म्हणून राजीनामा सत्र सुरू केलं आहे. तर दुसरीकडे रुपाली चाकणकर यांना सातत्यानं पक्षात पद दिली जात आहेत म्हणून रूपाली ठोंबरे यांनी पक्षावरच टीकेची झोड उठवली आहे. याबाबत आज दोन्ही नेते अजित पवारांची पक्ष कार्यालयात भेट घेत आहेत. 


ऐन निवडणुकीच्या तोंडावर नाराजी आणि राजीनामा सत्र यामुळे पुन्हा एकदा पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अशातच रूपाली चाकणकर यांना दिली जाणारी पदे आणि जबाबदाऱ्या यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यांनी देखील यावेळी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. अशातच निवडणुकीआधी सुरू झालेलं हे नाराजीनाट्य पक्षाची डोकेदुखी ठरू शकतं त्यावर अजित पवार आणि पक्षातील श्रेष्ठ नेते काय निर्णय घेणार ते पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.