Bacchu kadu on Ravi rana : नवनीत राणा (Navneet rana) यांना खुद्द रवी राणा (Ravi rana) यांनी खासदार होऊ दिलं नाही, असं वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाटे प्रमुख बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी केलं आहे. नवनीत राणा या खासदार होऊ नये, याला रवी राणा हेच जबाबदार आहेत. एखाद्याला निवडणूक लढायची असते तेव्हा सगळ्यांना समजून घ्यायला लागतं असेही कडू म्हणाले.


अमरावती येथील सगळ्या भाजपच्या नेत्यांशी रवी राणांनी वैर घेतलं होतं. त्यांच्याशी वाद घातला होता. त्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव झाल्याचे बच्चू कडू म्हणाले. आता विधानसभेला काय होतं ते बघा असेही ते म्हणाले. बच्चू कडू हे आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. पुण्यात आज परिवर्तन महाशक्तीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी (Raju Shetti) उपस्थित होते. या बैठकीत 150 जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर बच्चू कडू बोलत होते. 



अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंनी केला नवनीत राणांचा पराभव 


महाराष्ट्रातील अमरावतीमधून भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. अमरातवीत भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या समोर काँग्रेसचे बळवंत वानखेडे उभे होते. या लढतीत वानखेडे यांनी राणांचा पराभव केला. या दोघांमधली ही स्पर्धा खूपच चुरशीची होती. मतमोजणी सुरु झाल्यापासून कधी नवनीत राणा तर कधी बळवंत वानखेडे आघाडीवर होते पण जनतेने वानखेडेंचीच निवड केल्याचं चित्र स्पष्ट झालं. अमरावती मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं होतं. 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर 2014 मध्ये नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. अमरावती लोकसभेची जागा अनेकवेळा शिवसेनेकडे गेली आहे. मात्र, येथून भाजपला कधीही विजय मिळाला नाही. नवनीत यांनीही अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. मात्र, यावेळी त्या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, यावेळीही अमरावतीतून भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.