पुणे : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर राज्यपालांकडून 12 जणांची नियुक्ती केली जाते. राज्यपालांकडून वाड:मय, शास्त्र, कला, सहकारी चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्रांमध्ये विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असणाऱ्या व्यक्तींना संधी दिली जाते. राज्यपाल रमेश बैस यांनी 7 नावांना मंजुरी दिल्यानंतर विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी  चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि धर्मगुरु बाबुसिंग महाराज राठोड,हेमंत पाटील,मनीषा कायंदे, पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवार यांनी सामाजिक समीकरण साधत पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना संधी दिली मात्र, या निर्णयानंतर त्यांच्या पक्षात नाराजीचा सूर उमटला आहे. अजित पवारांच्या पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर यांना डावलण्यात आल्याचा आरोप करत रामदास गाडे पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं म्हटलंय. 


ज्यांच्या घरात आमदार, खासदार मंत्रिपद असणाऱ्यांना संधी : रामदास गाडे पाटील


विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी जाहीर करुन त्यांना सपथ देण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसनं दीपक मानकर यांना संधी द्यायला पाहिजे होती, असं रामदास गाडे पाटील म्हणाले. ज्यांच्या घरात सतत आमदार खासदार मंत्रिपद आहे, अशांनाच    पुन्हा पुन्हा संधी देण्यात आली आहे, असं रामदास गाडे पाटील म्हणाले. 


मराठा समाजाला जाणून बुजून डावलण्याचा प्रकार समोर येत आहे. कायम मराठा समाजाच्या ताकदवर कार्यकर्त्यांना पक्षात दुय्यम भूमिकेत वागवलं जात असून एका विशिष्ट समाजाला कायम झुकतं माप दिल गेलंय, असं गाडे पाटील म्हणाले.  मराठा समाजाचा पक्षात उद्रेक  झाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याची पक्षाला मोठी किंमत मोजावी लागेल, याची पक्षाने गंभीर दखल घ्यावी, असं रामदास गाडे पाटील म्हणाले. याशिवाय पक्षाच्या प्रमुखांकडे पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा सोपवणार असल्याचं देखील पाटील यांनी म्हटलं.  


अजित पवार यांचा सामाजिक समीकरणाचा प्रयत्न


अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद आल्यानंतर झालेल्या राज्यसभेच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी प्रफुल पटेल यांना संधी दिली. त्यानंतर  झालेल्या राज्यसभेच्या एका जागेवर सुनेत्रा पवार आणि दुसऱ्या जागेवर नितीनकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मध्यंतरी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना आमदारकी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं आता विधानपरिषदेवर संधी देताना अजित पवार यांनी सामाजिक समीकरण साधल्याचं पाहायला मिळतं. एकीकडे पंकज भुजबळ यांना विधानपरिषदेवर संधी देताना ओबीसी मतदारांना सोबत घेण्याचा अजित पवारांचा प्रयत्न असेल. तर, इद्रिस नायकवडी यांना संधी देत मुस्लीम मतदार देखील आपल्यासोबत जोडण्याच्या दृष्टीनं हे पाऊल त्यांना फायदेशीर ठरणार आहे. 


इतर बातम्या : 


Maharashtra Politics : विधानपरिषदेच्या 12 पैकी 7 जागांवर आमदारांची नियुक्ती, पाच जागा रखडल्या? अजित पवार म्हणाले...