पुणे: अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी शनिवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता अतुल बेनके हे अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडणार आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. खासदार अमोल कोल्हेच्या घरी ही भेट घडली, याला शरद पवारांनी ही दुजोरा दिलेला आहे. ते आत्ता कोणत्या पक्षात आहेत? मला ते अजित पवार गटात आहेत, याची मला कल्पना नाही. तो माझ्या मित्राचा मुलगा आहे, त्यामुळं यावर फार चर्चा नको, अशा सूचक शब्दांत शरद पवारांनी अतुल बेनके यांच्या पक्षप्रवेशावर सूतोवाच केले.


शरद पवारांचं सूचक वक्तव्य


शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अतुल बेनके तुमच्या पक्षात येणार का? ते तुमच्या भेटीसाठी का आले होते? याबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावर शरद पवार यांनी म्हटले की, यामध्ये नवीन काय आहे? आमच्यात काही चर्चा झालेली नाही. लोक भेटायला येतात. अतुल बेनके यांचे वडील माझे मित्र होते. आमच्या मित्राचा तो मुलगा आहे. यामध्ये काही राजकारण होत असेल तर त्यावेळेला त्याचा निकाल देऊ , त्याची इथे चर्चा करण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम केले ते आमचे. त्यांच्या हिताची जपणूक ही आमची जबाबदारी आहे, असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर तटस्थ भूमिका घेणाऱ्या आमदारांमध्ये अतुल बेनके यांचा समावेश होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघातून शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे यांनी विजय मिळवला होता. अतुल बेनके यांचे जुन्नर विधानसभा क्षेत्र शिरुर मतदारसंघात येते. शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे लोकसभा निवडणुकीत अतुल बेनके यांनी अमोल कोल्हे यांना मदत केली का, अशी चर्चा आता रंगली आहे.


शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनके काय म्हणाले?


शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अतुल बेनके यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राजकारणात काहीही घडू शकतं, अगदी शरद पवार आणि अजित पवार ही एकत्र येऊ शकतात. त्यामुळं पुढं काहीही घडू शकतं. शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनी तुतारी वाजविण्याचे संकेत दिले आहेत.


VIDEO: अतुल बेनके शरद पवारांच्या भेटीला, राजकीय चर्चांना उधाण



आणखी वाचा


मोठी बातमी : शरद पवार-अजितदादा आज पुण्यात आमनेसामने, राजकीय घडामोडींना वेग