पुणे: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेते पक्षातून उमेदवारी न मिळाल्यास दुसऱ्या पक्षांमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. अशातच इंदापुर मतदारसंघात देखील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. या मतदारसंघातील भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास शरद पवारांच्या पक्षाची तुंतारी फुंकतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. अशातच या मुद्द्यांवरून इंदापुरातील शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. आयात उमेदवाराला संधी देऊ नका, अशी मागणी त्यांनी यावेळी केल्याची माहिती आहे. हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार असल्याची इंदापुरात जोरदार चर्चा सुरू आहे, त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे हे कार्यकर्त्यांसह शरद पवारांची भेट घेतली. 


शरद पवारांची भेट घेतल्यानंतर दशरथ माने यांनी तुम्ही द्याल तो उमेदवार निवडून येईल, आपण चुकीचा निर्णय घेऊ नका अशी विनंती यावेळी केली. तर आप्पासाहेब जगदाळे यांनी सहा जण उमेदवार आहेत कुणालाही उमेदवारी द्या, ज्यांनी ज्यांनी ताईंना विरोध केला आहे त्यांना आम्ही घरी बसवू असा विश्वाय यावेळी व्यक्त केला आहे. 


शरद पवार नेमकं काय म्हणाले?


तर कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भूमिकेवर शरद पवार बोलताना म्हणाले, महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण आहे. लोकसभेला वेगळं चित्र होतं. प्रधानमंत्री सांगत होते 400 च्या वर जागा येतील. पाच वर्षपूर्वी जी निवडणूक झाली त्यात राष्ट्रवादी चार आणि काँग्रेसचा एक आला. राष्ट्रवादीने 10 जागा लढल्या त्यातील 8 आल्या. लोकांचे मत कार्यकर्त्यांशी मताशी संबंधित होते. म्हणून आपल्याला यश मिळाले. नेते आणि नागरिक यांचे मत वेगळे होते. बारामतीत अनेक नेत्यांनी भाषणं केली आम्ही जागा जिंकणार असे सांगत होते. पण लोकांनी आणि तुम्ही ठरवले होते.1 लाख 58 हजार मतांनी तुम्ही आपली जागा निवडून आणली.


काही लोक अशी असतात की, आभाळकडे बघून पाऊस पडेल का नाही ते पाहतात. पण आता कळायला लागले की, पाऊस पडेल त्यामुळे गर्दी वाढली आहे. कुठंही गेलो तरी हजारोच्या संख्येने लोकं भेटतात. लोकांच्यात खात्री झाली की, या निवडणुकीत काही झालं तरी जिंकायचं. चांगले निकाल लागतील यात शंका नाही. ही निवडणूक 3 लोकं एकत्र येऊन लढणार आहेत. संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. प्रत्येक तालुक्यात सर्व्हे केला जाणार आहे. इच्छुक उमेदवाराला विचारायचे नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय वाटत विचारले जाईल आणि मग निर्णय घेतला जाईल, अशी माहिती यावेळी शरद पवारांनी दिली. 


पुढच्या 8 ते 10 दिवसात हे काम संपले पाहिजे.निवडणूक आयोग तारीख लवकरच ठरवेल. माझा अंदाज आहे की, 6 ते 10 च्या दरम्यान तारखा जाहीर करतील. 15 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान मतदान होईल असा अंदाज आहे. पुढच्या काही दिवसात जागेचा निर्णय होईल. आपल्या जिल्ह्यात उमेदवारांची संख्या फार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि लोकांच्यात चर्चा सुरू झाली आहे. इंदापूरमध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थता आहे. सगळ्यांना विचारून निर्णय घेतला जाईल. निवडून येण्याची क्षमता बघितली जाईल. इंदापूरमध्ये बदल घडेल असे वातावरण आहे. काही जागा काँग्रेस आणि सेनेला द्याव्या लागतील, आघाडी आहे म्हटल्यावर सगळ्या जागा घेऊन चालत नाही काही जागा सोडव्या लागतील, जागा सोडून चालणार नाही त्यांचे कामही करावे लागेल. तुम्ही निवडणुकीत कष्ट केले त्यामुळे तुम्हाला मागणी करण्याचा अधिकार आहे. आमदार राष्ट्रवादीचा हा निकाल घेऊन तुम्ही कामाला लागा, अशा सूचना शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. 


महाविकास आघाडीत इंदापूरची जागा शरद पवार गटाला 


इंदापूरची जागा महाविकास आघाडीत शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपकडून संधी न मिळाल्यास हर्षवर्धन पाटील यांच्याकडे तुतारी हाती घेण्याचा पर्याय आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचा देखील तसा आग्रह आहे. पण शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना आयात उमेदवार नको आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे.