बारामती : बारामतीतील हॉटेल चालकाकडे खंडणी मागणाऱ्या बारामतीतील कुप्रसिद्ध एनटी भाईच्या टोळीतील पाच जणांवर पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केलीय. बारामतीतील नितीन तांबे, अमीन इनामदार, गणेश बोडरे याच्यासह दोन अनोळखी साथीदारांचा यात समावेश आहे. या 5 जणांवर संघटितपणे 13 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. 


कारवाई केलेले हे आरोपी 7 फेब्रुवारीला बारामती-फलटण रस्त्यावरील स्नेहा गार्डन हॉटेलमध्ये गेले होते. हॉटेल सुरु ठेवायचे असेल तर दरमहा 25 हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी या आरोपींनी केली होती. नितीन तांबे याने मी एनटी भाई आहे, तू मला ओळखत नाहीस का? माझे पुण्यात भाई लोकांशी संबंध आहेत. दरमहा खंडणी दिली नाही तर स्वतः एनटी भाई येईल हे लक्षात ठेव अशी दमदाटी हॉटेल मालकास केली होती. अमिन इनामदार व अन्य लोकांनी एनटी भाईचे लांबपर्यंत संबंध आहेत. तू जर आमच्याविरोधात पोलिसात गेला तर आम्ही जेलमध्ये बसू, पण जेलमधून सुटल्यावर तुझा गेम करू अशी धमकी दिली होती. 


नितीन तांबे याने हॉटेलमधील काऊंटरच्या ड्रॉवरमध्ये असणाऱ्या मद्याच्या बाटल्या तर इतरांनी बियरच्या बाटल्या जबरदस्तीने काढून घेतल्या आणि ते हॉटेलमध्ये पित बसले. नितीन तांबे याने मी आत्ताच मोक्का तोडून जेलमधून बाहेर आलो आहे, असं म्हणत फाईट मारली. तसेच खिशातून चाकू काढून हप्ता काढून दिला नाही तर हॉटेलबाहेर आल्यावर तुझे तुकडे पाडू अशी धमकी दिली होती. इनामदार याने पांढऱ्या धातूचेकडे हातात घेत फिर्यादीच्या पोटात फाईट मारली होती. 


गल्ल्यातील 7200 रुपये व हॉटेलचे लायसन्स, फिर्यादीच्या हातातील घड्याळ जबरीने दरोडा टाकून नेले होते. या टोळीविरोधात  हॉटेल चालक अतुल पवारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याआधी या आरोपीवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, धमकावणे असे गुन्हे दाखल होते. त्याची गंभीर दखल घेत बारामती पोलिसांनी मोक्काचा प्रस्ताव तयार केला होता. तो विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठवला होता. त्याला नुकतीच मंजूरी मिळाली. या कामगिरीबद्दल पोलीस अधिक्षकांनी बारामती पोलिसांना 15  हजाराचे बक्षीस जाहीर केलं आहे. अमीन इनामदारला पोलिसांनी अटक केली आहे.  बाकीचे 4 जण फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि ज्यांच्यापासून नागरिकांना धोका आहे, अशा इतर गुन्हेगारांवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली. पोलीस उपअधीक्षक नारायम शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती पोलीस अधिक तपास करत आहेत.