Pune Roof Top Hotel : पुण्यातील (pune) बेकायदेशीर रुफ-टॉप पब (Roof top hotel) आणि बारवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलीस विभागाच्या अनेक परवाना संबंधित नियमांचं उल्लंघन केल्यामुळे या पब आणि बारवर कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर अशा 19 पब आणि बारवर कारवाई केली आहे. पुणे महानगरपालिकेने (PMC) बालेवाडी हाय स्ट्रीट परिसरात सुमारे 12 पब आणि बारला बेकायदा बांधकामे केल्यामुळे नोटिसा बजावल्या.


राज्य उत्पादन शुल्क  विभागाच्या पथकाने या पब आणि बारचा आधीच शोध घेतला होता आणि त्यांच्या मॅनेजरला लेखी पत्र देत त्यांनी याबद्दलची माहिती देण्यात आली होती. त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दंड आकारण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे, असं राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांनी सांगितले आहे.


गेल्या एका महिन्यात पब आणि बार असलेल्या 23 ठिकाणी परवाना मार्गदर्शक नियमांचं उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. उल्लंघन करणाऱ्यांना दंड करण्याचा प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित असल्याचं पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रमुख सी बी राजपूत यांनी स्पष्ट केलं आहे.


पुण्यात अनेक इमारतींवर अशा प्रकारचे हॉटेल्स बघायला मिळतात. रूफटॉप पब आणि बारवर विशेष लक्ष देऊन टेरेस किंवा इमारतींच्या छतावरील बेकायदा बांधकामांवर तातडीने कारवाई करणं आवश्यक आहे. महंमदवाडी, कल्याणीनगर, येरवडा, कोरेगाव पार्क, बाणेर, पाषाण, कोथरूड, खराडी आणि शहरातील इतर वरच्या भागात असलेल्या प्रसिद्ध रूफटॉप पब आणि बारवर कारवाई करण्यात आली आहे, असं पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्यांच्या आदेशात सांगितलं आहे.


पुण्यातील अनेक परिसरात रुफ टॉप हॉटेल्स आणि बार आहेत. हे बार रात्री उशीरापर्यंत सुरु असतात. अनेक तरुण मंडळीचं सध्या आवडीचं ठिकाण म्हणजे अनेक रुफ टॉप हॉटेल्स आणि बार झाले आहेत. तरुणांचा आवाज आणि राडा त्यात रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याने गाण्याच्या आवाजाबाबत अनेकदा स्थानिकांनी तक्रारी दिल्या होत्या. यावेळी पोलिसांवर देखील नागरीक मंचाने आरोप केले होते. एकून 77 रुफटॉप हॉटेल्स महापालिकेच्या रडारवर आहे. त्यातील फक्त सहाच हॉटेल्सकडे योग्य ते परवाने असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर महापालिकेने 67 हॉटेल्स आणि बारला नोटीसा बजावल्या आहेत. त्यातील 19 बारवर कारवाई करण्यात आली आहे.