पुणे : पुण्यातील वाहतुकीसाठी सगळ्यात महत्त्वाचा (Pune Traffic news) असलेल्या भिडे पुलासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भिडे पुलाजवळील (bhide bridge) वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या भागात पुणे महानगरपालिका पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरु करणार आहे. त्यामुळे हा पूल आता दोन महिने पुणेकरांना वापरता येणार नाही आहे. मात्र यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आले आहे. त्यामुळे दोन महिने पुणेकरांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे.
पुणे शहरात अनेक ठिकाणी महापालिकेतर्फे विविध कामं सुरु आहे. अनेक परिसरात खड्डे बुजवण्याचंदेखील काम सुरु आहे शिवाय पुण्यात मेट्रोचंदेखील काम सुरु आहे. या कामांमुळे वाहतूक कोंडी होते आणि याच वाहतूक कोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागतो. त्यात आता भिडे पूल बंद करण्यात येणार असल्याने पुणेकरांना वळसा घालावा लागणार आहे. डेक्कन जिमखाना येथील पीएमपी स्थानक ते भिडे पूल दरम्यान पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सोमवारपासून (16 ऑक्टोबर) सुरू करण्यात येणार आहे. हे काम साधारणपणे 15 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. गरज भासल्यास केळकर रस्तामार्गे भिडे पुलावरुन डेक्कन जिमखान्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
- केळकर रस्तामार्गे डेक्कन जिमखान्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
- केळकर रस्त्यावरुन जंगली महाराज रस्त्याकडे जाणारे, तसेच जंगली महाराज रस्त्यावरुन केळकर रस्तामार्गे नारायण पेठेकडे येणाऱ्या वाहनचालकांनी शक्यतो गाडगीळ पुलाचा (झेड ब्रीज ) वापर करावा.
- भिडे पूल, सुकांता हाॅटेल, खाऊ गल्लीमार्गे जंगली महाराज रस्त्याने वाहनचालकांनी इच्छितस्थळी जावे.
पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेना...
पुण्याला आणि पुणेकरांना वाहतूक कोंडी आता रोजचा विषय झाला आहे. त्यात पुणेकरांना प्रत्येक परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने अनेकदा या विरोधात प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटताना दिसतात.त्यात पावसाळा आला की रस्त्यांवर पाणी साचतं त्यामुळे अनेक पुणेकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेळी कामं सुरु आहे त्यात मेट्रोच्या कामामुळे पुण्यात अनेक परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीवर उपाय शोधा,अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून विचारला जात आहे.
इतर महत्वाची बातमी-