पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच अभाविप आणि स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एसएफआय, या दोन विद्यार्थी संघटनेच्या राड्यानंतर पुणे विद्यापीठातलं वातावरण चांगलच तापलं आहे.

काल अभाविप आणि एफएसआयच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी पोलिसांनी 9 विद्यार्थ्यांना अटक केली आहे. तसंच प्रकरण चिघळू नये म्हणून कॅम्पसमध्ये मोठा पोलीस फौजपाटा तैनात करण्यात आला आहे.

सैनिकांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे आमदार प्रशांत परिचारकांच्या निषेधार्थ 27 तारखेला मोर्चाचं आयोजन केलं होतं. यासाठी एफएसआच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात पोस्टर्स लावले होते. त्या पोस्टर्सवर भाजपचा उल्लेख असल्यामुळं अभाविपनं आक्षेप घेतला आणि दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

यासंबंधीची माहिती देताना, आमदार प्रशांत परिचारक यांच्या निषेधार्थ एसएफआयचे 4 ते 5 कार्यकर्ते लावत होते. त्यावेळी अभाविपच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप एसएफआयनं केला आहे.



तर उमर खलीदचा निषेध एसएफआयच्या कार्यकर्त्यांना पटला नाही. म्हणून त्यांनी अभाविप मुर्दाबादचे पोस्टर्स विद्यापीठात लावण्यास सुरुवात केली. त्याला अभाविपच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. त्यावर एसएफआयच्या वतीनं शिवीगाळ करुन अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप अभाविपनं केला आहे.

या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. दरम्यान आज संध्याकाळी एफएसआयच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधून घटनेचा निषेध व्यक्त केलाय.