पुणे : संसार आणि नोकरी सांभाळताना अनेक नोकरदार महिलांना तारेवरची कसरत करावी लागते. अशीच वेळ पुण्यातील एका बँक अधिकारी महिलेवर आली आणि संसदेत झोपा काढणाऱ्या खासदारांचे कान टोचण्यासाठी त्यांनी एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला.


 
काय आहे या फोटोत?

 
स्वाती चितळकर ही पुण्यातील बँक अधिकारी महिला. बँकेत आपल्या टेबलवरुन स्वाती काम करत असताना त्यांचा तापाने फणफणलेला लहानगा मागे जमिनीवर पहुडला आहे. बाटलीतून तो दूध पित असताना हा फोटो काढला आहे. हा फोटो गेल्या आठवड्यात चितळकर यांनी फेसबुकवर पोस्ट केला आणि सोबत एक भावनात्मक संदेश लिहिला.

 
'जमिनीवर बाळ नाही, माझं हृदय ठेवलं आहे. तो तापाने फणफणला होता आणि कोणासोबत राहायला तयार नव्हता. अर्धा दिवस झाला होता आणि मी मध्येच काम सोडून जाऊ शकत नव्हती. एका ग्राहकाची कर्जाची फाइल तातडीने आली, मात्र मी दोन्ही जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्या. संसदेत झोपा काढणाऱ्या मंत्र्यांना मला फक्त हा संदेश द्यायचा होता.'

 
स्वाती चितळकर यांच्या पोस्टला 22 हजारांपेक्षा जास्त जणांनी शेअर केलं आहे. एका नोकरदार आईचं प्रतिनिधित्व करणारा हा फोटो असल्याचं सांगत अनेकांनी सहानुभूती  व्यक्त केली आहे.

 

 



 
माझ्या तीन वर्षांच्या मुलाची तब्येत बरी नव्हती. माझे पती घरची कामं करत मुलाला सांभाळतात, मात्र दुपारच्या सुमारास तो वडिलांनाही जुमानेना. माझ्या पतींनी मला फोन करुन तसं सांगितलं आणि मी मुलाला ऑफिसमध्ये बोलावून घेतलं, असं त्या सांगतात.

 
स्वाती यांच्यापेक्षा सात वर्षांनी तरुण असलेले त्यांचे पती बाळाला सांभाळत आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करत आहेत. यशस्वी क्रिकेटपटू होण्यासाठी स्वाती यांनी पतीला एका बहुराष्ट्रीय कंपनीचा राजीनामा द्यायला लावलं. पुण्यातील एका क्रिकेट अकादमीत सामील होऊन त्यांना स्वप्नांचा मागोवा घेण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे.

 
फुटपाथ आणि झोपड्यात राहणाऱ्या मुलांसाठीही माझा जीव तीळतीळ तुटतो. जरी या मुलांनी तुम्हाला मतदान केलं नसलं, तरी एका आईप्रमाणे तुम्ही पंतप्रधान म्हणून त्यांची काळजी घ्या, अशी आर्त मागणी त्या करतात.