पिंपरी चिंचवड : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या पिंपरी चिंचवडमधील इमारतीत आज सकाळी एक तरुण घुसला. नकली बंदूक आणि स्वयंपाकघरात वापरला जाणारा चाकू घेऊन या 24 वर्षीय तरुणाने सकाळी साडेसातच्या सुमारास इमारतीत प्रवेश केला. यावेळी झालेल्या झटापटीत सोनालीच्या वडिलांना चाकूने इजा झाली, अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे.


हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यात राहतो. अजय शेट्टे असं 24 वर्षीय तरुणाचं नाव आहे. आपण सोनालीचा फॅन असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं.


मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये सोनाली कुलकर्णीने पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत फ्लॅटच्या गॅलरीत उभं राहून थाळी वाजवली होती. याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यात सोनालीची हीच इमारत दिसत होती. हा फोटो त्याने निरखून पाहिला होता. अशात नुकतंच सोनालीने दुबईत लग्न केलं. त्यामुळे हा या तरुणाचा अपेक्षाभंग झाल्याचं दिसत होतं. मग त्याने ही इमारत शोधून काढली आणि आज सकाळी तो इमारतीत घुसला. 


सकाळी साडे सात वाजता तो इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आला. बाहेर कोणीतरी अज्ञात आलाय हे पाहून दुसऱ्या मजल्यावरील रहिवाशांनी सोनालीच्या वडिलांना फोन केला. तिसऱ्या मजल्यावरुन ते खाली येत होते, हे पाहून हा तरुण खाली धावला. गेटवरुन उडी मारुन तो जाणार तेव्हाच सोनालीच्या वडिलांनी तू कोण आहेस? इथे काय करतो? असं विचारलं. तेव्हा त्याने नकली बंदूक आणि स्वयंपाकासाठी घरात वापरला जाणारा चाकू बाहेर काढला. "माझ्या मागे पोलीस लागले आहेत, मला इथे राहू द्या," असं म्हणत तो पुन्हा इमारतीत आला. त्यावेळी त्याला रहिवाशांनी पकडलं. याच झटापटीत सोनालीच्या वडिलांना चाकूने इजा झाली.


दरम्यान, तरुणाने इतर कारणं सांगितली असली तरी तो सोनाली कुलकर्णीकडेच आला होता हे आता पोलीस तपासात समोर आलं आहे. पण नकली बंदूक आणि चाकू घेऊन तो नेमकं कशासाठी आला होता? काय करणार होता? याचा छडा पोलीस लावत आहेत.