Sawai Gandharva Mahotsav Pune 2023 : पुण्यातील संगीतप्रेमी यांची अखेर प्रतीक्षा संपली आहे. पुणेकरांचा (Sawai Gandharva Mahotsav Pune 2023) आणि त्यातच संगीतप्रेमींचा सगळ्यात आवडत्या महोत्सवाची आजपासून सुरुवात झाली आहे. परंपरेनुसार तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने 69 व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. त्यांनी राग मधुवंतीने सुरुवात केली आणि 'वैष्णव जन तो' या भजनाच्या वादनाने त्यांनी सांगता केली.
यानंतर किराणा घराण्याचे गायक संजय गरूड यांनी गायनाची सुरुवात राग भीमपलास मधील 'अब तो बडी देर' या रचनेतून केली. त्याला जोडून द्रुत त्रितालात 'बीरज मे धूम मचाए शाम' ही प्रसिद्ध बंदिश त्यांनी रंगवली. 'माझे माहेर पंढरी' या प्रसिद्ध अभंगाने त्यांनी भक्तिरसपूर्ण भाव निर्माण केले. 'सवाई' च्या स्वरमंचावर सुविख्यात गायक पं. कुमार गंधर्व यांना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांनी आपल्या बहारदार सादरीकरणातून कुमारजींच्या समृद्ध आणि प्रयोगशील गायन वारशाचे दर्शन घडवले.
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव मागील 69 वर्षांपासून आयोजित करण्यात येतो. अनेक वर्ष दिग्गज कलाकारांनी हा मंच गाजवला आहे. यावर्षी 13 ते 17 डिसेंबर 2023 दरम्यान हा दैदीप्यमान सोहळा संपन्न होणार आहे. मुकुंदनगरमधील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडासंकुलात हा महोत्सव होत आहे.
पीएमपीकडून जादा गाड्यांची सुविधा
शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अग्रमानांकित असलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी पीएमपीकडून जादा गाड्यांची सुविधा देण्यात आली आहे. ही विशेष सुविधा बुधवार(13 डिसेंबर) ते रविवार (17 डिसेंबर) या कालावधीत असणार आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच अन्य शहरातूनही असंख्य रसिक महोत्सवासाठी उपस्थित रहात असतात. सवाई गंधर्व संगीत महोत्सव संपल्यानंतर परतीच्या सोयीसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी 25 टक्के जादा दराने तिकिट आकारणी करण्यात येणार आहे.
मुकुंदनगर ते निगडी, मुकुंदनगर ते धायरी, मुकुंदनगर ते कोथरूड डेपो, मुकुंदनगर ते वारजे माळवाडी या मार्गांवर जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या सर्व गाड्या रात्री साडेदहा वाजता सुटणार असून शनिवारी (16 डिसेंबर) रात्री साडेदहा आणि रात्री साडेबारा वाजताही जादा गाड्यांची सुविधा असणार आहे. मुकुंदनगर ते निगडीसाठी प्रती प्रवासी 40 रुपये, मुकुंदनगर ते धायरीसाठी प्रती प्रवासी 25 रुपये, मुकुंदनगर ते कोथरूड डेपोसाठी प्रती प्रवासी 20 रुपये आणि मुकुंदनगर ते वारजे माळवाडीसाठी प्रती प्रवासी 25 रुपये अशी तिकिट आकारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
कोणत्या दिवशी कोणते दिग्गज लावणार उपस्थिती ?
13 डिसेंबर 2023। दुपारी ३ वाजता
तुकाराम दैठणकर आणि सहकारी - सनई
संजय गरूड - गायन
कलापिनी कोमकली - गायन
पं. तेजेंद्र नारायण मजुमदार - सरोद पं. उल्हास कशाळकर - गायन
भीमसेन महोत्सव
14 डिसेंबर 2023| दुपारी 4 वाजता
अंकिता जोशी - गायन
पं. उपेंद्र भट - गायन
पार्था बोस - सतार
विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे - गायन
15 डिसेंबर २०२३ | दुपारी 4 वाजता
रजत कुलकर्णी - गायन
श्रीमती पद्मा देशपांडे - गायन
नीलाद्री कुमार - सतार
पं. अजय पोहनकर आणि अभिजित पोहनकर - गायन
16 डिसेंबर 2023| दुपारी 4 वाजता
प्राजक्ता मराठे - गायन
देबप्रिय अधिकारी व समन्वय सरकार - गायन आणि सतार श्रीमती यामिनी रेड्डी - कुचीपुडी
अभय सोपोरी - संतूर
बेगम परवीन सुलताना - गायन
17 डिसेंबर 2023 | दुपारी 12 वाजता
श्रीनिवास जोशी - गायन श्रीमती पौर्णिमा धुमाळे - गायन
पं. सुहास व्यास - गायन
ऐश्वर्या वेंकटरामन आणि सहकारी - कर्नाटक शास्त्रीय संगीत कौशिकी चक्रवर्ती - गायन
पं. रोणू मजुमदार - बासरी
डॉ. प्रभा अत्रे - गायन