पुणे : पुणे महापालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक बंडाच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. महापालिकेत पदं न मिळाल्याने हे नगरसेवक नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे 19 नाराज नगरसेवक महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान या नगरसेवकांचं बंड ठंड करण्यासाठी भाजपचं नेतृत्त्व सतर्क झाल्याचंही कळतं.
मतदारसंघासाठी निधी उपलब्ध होत नसल्याची तक्रार भाजप नगरसेवकांनी शहराध्यक्षांना केली होती. पण याबाबत टाळाटळ करत निवड लोकांनाच विचारपूस होत असल्याने भाजपचे नगरसेवक नाराज असल्याचं कळतं.
हा निव्वळ खोडसाळपणा : महापौर मुरलीधर मोहोळ
"या चर्चांमध्ये एक टक्काही सत्यता नाही. हा निव्वळ खोडसाळपणा आहे. नगरसेवकांच्या नाराजीचा आणि बंडखोरीचा कोणताही विषय भाजपमध्ये नाही. एकहाती सत्ता महापालिकेत आहे. निवडणूक जवळ आल्यामुळे जाणीवपूर्वक हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत," अशी प्रतिक्रिया महापौर, मुरलीधर मोहोळ यांनी दिली. "100 टक्के कुठलीही नाराजी नाही. सर्व समित्यांमध्ये सर्व नगरसेवकांना संधी दिली आहे. उर्वरित नगरसेवकांना या वर्षी संधी दिली आहे. निधी कमी पडला असं चित्र कुठेच नाही. नगरसेवक अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं वृत्त साप चुकीचं आहे," असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.
विरोधी पक्षाकडून नाराजीच्या बातम्या : संजय काकडे, माजी खासदार
विरोधी पक्षच नाराजीच्या बातम्या पसरवत असेल, माझ्या माहितीनुसार भाजपमध्ये कोणतीही नाराजी नाही, अशी प्रतिक्रिया माजी खासदार संजय काकडे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. "प्रत्येक पक्षात नाराजी असते. काही नगरसेवक नाराज असू शकतात. माझ्या माहितीनुसार कोणतेही नगरसेवक भाजप सोडून इतर पक्षात जाण्यास तयार नाही किंवा चर्चा नाही हे देखील तेवढंच खरं आहे. राष्ट्रवादीचे काही नाराज नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत,असंही ते म्हणाले.
अफवा पसरवून राष्ट्रवादीला काही साध्य होणार नाही : जगदीश मुळीक
या विषयी भाजपते पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, "भाजपमध्ये अशी कोणतीही परिस्थिती नाही. मागील शुक्रवारी प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांच्या बैठका घेतल्या. प्रत्येक नगरसेवकाश वैयक्तिकरित्या बोललो. नगरसेवकांमध्ये नाराजी नाही. विरोधकांकडून नाराजी पसरवली जात आहे. सगळे नगरसेवक संपर्कात आहेत. राजकारणाचा भाग म्हणून अफवा पसरवल्या जात आहेत. अशा अफवा पसरवून राष्ट्रवादीला काही साधता येणार नाही. सगळे नगरसेवक खुश आहेत, कामासाठी भेटतात."