पिंपरी चिंचवड : शहरातील पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. प्रेमप्रकरणातून अनिल निरवणे या कर्मचाऱ्याने पोलीस स्टेशनच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेतली होती. ही घटना 1 जानेवारीच्या रात्रीची असून गुन्हा मात्र आत्ता दाखल झाला आहे.


निरवणे आणि महिला पोलीस उपनिरीक्षकांचे दीड वर्षांपासून प्रेम संबंध आहेत. दोघेही दिघी पोलीस स्टेशनमध्ये सध्या कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांच्यात वाद सुरू झाले होते. 1 जानेवारीच्या रात्री दोघांची एकाचवेळी ड्युटी लागली आणि वादाला पुन्हा तोंड फुटलं. यावेळी निरवणे यांनी महिला पोलीस अधिकाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देत, हे कृत्य केलं.


ऑनलाइन शॉपिंग करताना सावधान! तरुणाकडून ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल 22 हजार लोकांची फसवणूक


पोलीस कर्मचारी अनिल निरवणे आणि महिला पोलीस उपनिरीक्षक यांची साधारण दीड वर्षांपूर्वी घट्ट मैत्री झाली होती. दोघेही दिघी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याने एखादा दिवस वगळता रोजच भेट घडू लागली. त्यामुळेच या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. पण आता प्रेम म्हटलं की त्यात रुसवा-फुगवा आलाच. याच रुसव्या-फुगव्यातून वादाला तोंड फुटलं. वारंवार त्यांच्यात खटके उडू लागले. अशातच 2021 या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी दोघांची रात्रीची ड्युटी लागली. तेव्हा तर पोलीस स्टेशनमध्ये उपस्थितांच्या समोरच ते एकमेकांवर भडकले. यातून निरवणे यांनी महिला पोलीस अधिकारी यांना जीवे मारण्याची आणि स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करून घेण्याची धमकी दिली. पण त्यानंतर प्रकरण मिटेल असं वाटत होतं, तेव्हाच निरवणे यांनी पोलीस स्टेशनच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेतली. यात ते बचावले खरे मात्र त्यांना चांगलीच इजा पोहचली. ही धक्कादायक घटना पोलीस स्टेशनमध्येच घडल्याने याप्रकरणी तातडीनं गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं. मात्र, यात कमालीची दिरंगाई झाली. त्यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.