बारामती : महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, हे त्या पक्षाने लक्षात ठेवावे व त्या आमदारानेही लक्षात ठेवावे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी दिला आहे. इंदापूर दौऱ्यावर असताना खासदार सुप्रिया सुळेंनी राम कदमांच्या बेताल वक्तव्यासंदर्भातही भाष्य केलं.


खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. सकाळपासून त्या तालुक्यातील गावांना भेटी देत होत्या. त्यावेळी तालुक्यातील हिंगणगाव येथील एका सभेत बोलताना त्यांनी राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

पुरोगामी महाराष्ट्रात सत्तेत असणारा एक आमदार जर महिलांना व मुलींना पळवून नेण्याची भाषा करत असेल, तर यासारखा काळा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शिवाय, “संघर्ष करायची वेळ आली, तर तीच सावित्रीची लेक झाशीची राणी झाल्याशिवाय थांबणार नाही.” असेही त्या म्हणाल्या.

“मुख्यमंत्र्यांनी जाहीर निषेध करायला हवाय, त्यांनी स्वतः या विषयावर दिलगिरी व्यक्त करायला हवी होती. जर दिलगिरी  व्यक्त करता येत नसेल, तर या आमदारावर ॲक्शन घ्या, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा.” अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली. शिवाय, हे प्रकरण मुख्यमंत्र्यांना झेपत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, महिलांच्या सुरक्षेचं काय करायचे, ते आम्ही बघू, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

यावेळी, “महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात जरी लावला, तर गाठ सुप्रिया सुळेशी आहे, हे त्या पक्षाने लक्षात ठेवावे व त्या आमदारानेही लक्षात ठेवावे”, असा इशाराही दिला.

राम कदमांचं वादग्रस्त वक्तव्य

"कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लीज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा", असं राम कदम म्हणाले.

राम कदम यांचा माफीनामा

दहीहंडी उत्सवात महिलांविषयी केलेल्या बेताल वक्तव्याप्रकरणी भाजप आमदार राम कदम यांनी अखेर माफी मागितली आहे. राम कदम यांनी ट्विटरवर आपला माफीनामा सादर केला आहे. माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. राम कदम यांनी लिहिलं आहे की, "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली. झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुन:श्च माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे."