पुणे : आतापर्यंत आपण अनेक अनोख्या वाढदिवसांचं सेलेब्रेशन्स बघितलं आहे. त्यात अनेक मोठमोठ्या ठिकाणी जाऊन अनेकजण आपला वाढदिवस साजरा करतात. पुण्यातील भोरमधील 111 वर्षांच्या आजोबांचा वाढदिवसच असाच जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यातील वारवंड  ग्रामस्थांनी एक अनोख्या कार्यक्रमाचे नियोजन करुन गावातील आजोबांचा 111 वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करुन शुभेच्छा दिल्या. मारुती गणू दिघे (रा.वारवड) असे 111 वर्षीय आजोबांचे नाव आहे. भोर महाड रोडवर 30 किमी अंतरावर फाट्यापासून दिड किलोमीटर उंच डोंगरावर 300 लोकसंख्या असलेले वारवंड गाव आहे. या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थानी मांडव घातला होता. 


111 दिवे लावून, फुलांची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आजोबांनी   त्यांच्या शंभर वर्षीय पत्नी लक्ष्मीबाई यांच्या सोबत केक कापून आनंद व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांनी घोंगडी, फेटा, पोशाख देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याचबरोबर  गावातील असणाऱ्या वृद्धांचाही सत्कार करण्यात आला.  हा वाढदिवसाचा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतून नागरीकांनी  उपस्थिती दाखवून शुभेच्छा दिल्या. आलेल्या सर्व उपस्थितांना शाकाहारी मांसाहारी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. हिरडस मावळात पहिल्यांच असा वाढदिवस साजरा केल्याने या वाढदिवसाची चांगलीच चर्चा रंगली आहे.


या सोहळ्यासाठी पुण्यामुंबई आणि इतर ठिकाणी असणाऱ्या गावकऱ्यांनी उपस्थिती दाखवली. गावचे पोलिस पाटील आणि  भोर तालुका पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष सुधीर दिघे, माजी सरपंच लक्ष्मण दिघे, आजोबांचे नातू उपसरपंच प्रदिप दिघे, संदिप दिघे सह जय हनुमान सेवा मंडळ व ग्रामस्थांनी या अभिष्टचिंतन सोहळ्याचे नियोजन केले होते. या पुढे ज्येष्ठांचे वाढदिवस साजरे करून त्यांना सन्मानित करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 


शेतकरी कुटुंबातील मारुती दिघे यांनी शेती व जनावरे पाळून करून आपला संसार चालवला. त्यांना किसन व सखाराम अशी दोन मुले, दोन मुली तसेच नातवंडे, परतूंडे असा मोठा परिवार आहे. लहान पणापासून काबाड कष्ट करत वयाच्या 111 व्या वर्षांपर्यंत मजल मारली आहे. नाचणी वरईच्या भाकरी, दुध,ताक, रानभाज्या हा त्यांचा सकस आहार तर शेताच्या ताली बांधणे, शेतीची मशागत अशा‌ कष्टाच्या कामातून होणारा व्यायाम हेच त्यांचे‌ शरीर निरोगी दिर्घ आयुष्याचे गणित आहे.


इतर महत्वाची बातमी-


Fodder Shortage: राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध


मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता