मुंबई : मुंबईत (Mumbai Weather Update) तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढलाय. सांताक्रूझमध्ये 36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. सोमवारी मुंबईतील मतदानाच्या दिवशी 33 ते 35 अंशांदरम्यान तापमान असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. येत्या काही दिवसांत तापमानाचा (Mumbai Heat) पारा फारसा चढणार नसला तरी सध्याच्या उष्ण वातावरणापासूनही फारसा दिलासा मिळणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबईत उष्णतेसोबत आद्रता देखील वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील दमट वातावरणात वाढ होणार असून उकाडा वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासात मुंबईत उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत उष्णतेची लाट पसरली आहे. मुंबईतील कमान तापमान 39 अंशांवर पोचले आहे. यात घट होणार असली तरी आद्रता मात्र वाढणार आहे.
तर राज्यातील काही भागात वादळी पाऊस पडतो आहे, तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. पुढील एक ते दोन दिवस मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी भागात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे उष्म्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळेल. मुंबई आणि ठाणे तसेच रायगड, रत्नागिरी भागात शनिवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
विदर्भात वादळी पावसाची शक्यता
नागपूरसह विदर्भात पुन्हा दोन दिवसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात वादळी पावसाची शक्यता नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भात रविवारपर्यंत अवकाळी पावसाचे सावट आहे. मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला तरी विदर्भात उन्हाळ्याच्या तीव्रतेऐवजी सातत्याने वादळ, गारपीट, अवकाळी पाऊस बरसत आहे .
मान्सून 19 मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून 19 मेपर्यंत अंदमानमध्ये दाखल होऊ शकतो. त्यानंतर 31 मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील. त्यापुढील वातावरण पोषक असेल तर मान्सून 7 ते 10 जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.
हे ही वाचा: