पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगावातील (Pune Crime news) एका तीन इमारतीवर छापेमारी केली आहे. ‘महादेव बेटिंग ॲप’संबंधी केलेल्या कारवाईत पोलिसांच्या हाती मोठं धबाड लागलं आहे. तब्बल 62 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ऑनलाईन जुगारांच्या आर्थिक व्यवहार आणि पैसा वळवण्यासाठी 452 बँक खात्यांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या अॅपच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल झाल्याची माहित आहे.


महादेव सट्टेबाजी अॅपच्या माध्यमातून दुबई हवाला व्यवहार होत असल्याचा संशय पुणे ग्रामीण पोलिसांनी व्यक्त केला. हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म पोकर, क्रिकेट आणि फुटबॉल सारख्या खेळांवरील अवैध जुगाराशी जोडले गेले आहेत. यात आतापर्यंत 93 जणांना अटक करण्यात आली असून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, दोन मुख्य संशयितांचा शोध सुरू आहे.


नारायणगाव येथील एका तीन मजली इमारतीवर 15 मे रोजी छापा टाकून पोलिसांनी 93 जणांना ताब्यात घेतले आणि तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 45 लॅपटॉप, 89 मोबाइल, आरोपींनी वापरलेले 101 अतिरिक्त मोबाइल, 452 बँक पासबुक, चेकबुक आणि इतर साहित्य असा एकूण 62 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) सारख्या सेटअपमध्ये काम करणाऱ्या 88 जणांना दंडाधिकारी कोठडी सुनावण्यात आली आहे.


कुणाल सुनील भट (वय 28, रा. जळगाव), समीर युनूस पठाण (वय 25, रा. जुन्नर), रशीद कमाल शरीफ पुल्ला (वय 28), अमजद खान सरदान खान (वय 32, रा. उत्तर प्रदेश), यश राजेंद्रसिंह चौहान (वय 27, रा. राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हृतिक सुरेश कोठारी आणि राज बोकारिया या दोन प्रमुख संशयितांचा शोध सुरू आहे.


कॉल सेंटरच्या नावाखाली आरोपी बेकायदेशीरपणे काम करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. चांगल्या पगाराचे आमिष दाखवून त्यांनी विविध राज्यातील व्यक्तींना आमिष दाखविले, मात्र दोन ते तीन महिन्यांपासून वेतन न दिल्याने अनेक कर्मचारी अडकले.


हा सगळा प्रकार महादेव बेटिंग अॅपच्या माध्यामातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली आहे. हा सगळा मोठा व्यावहार आहे आणि संशयास्पददेखील आहे. यातील पैसे हे देशविरोधी कारवायांसाठी वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ऑनलाइन सट्टेबाजीतून मिळालेला पैसादेखील दुसऱ्या देशात पाठवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. साधारण बीपीओच्या नावाखाली हा प्रकार सुरु होता आणि महत्वाचं म्हणजे तिथेच काम करत असलेल्या व्यक्तीने यासंदर्भात माहिती दिली आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Fodder Shortage: राज्यात पाणीबाणीनंतर आता चारा टंचाईचे संकट; फक्त दोन महिने पुरेल इतकाच चारा उपलब्ध


मुंबईत पुढचे दोन दिवस उकाड्याचे तर विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट, वादळी पावसाची शक्यता