पुणे : पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या पार्वती शाखेमध्ये एका अमेरिकन तेल कंपनीचे 15 लोकर्स आहेत. या लॉकर्समध्ये दोन हजारच्या नोटेच्या स्वरुपात 10 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
या लोकर्समधून काही दिवसांपासून संशयास्पद व्यवहार होत असल्याचं बँकेतील अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर बँक व्यवस्थापनाकडून याची माहिती आयकर विभागाला देण्यात आली.
आयकर विभागाने तपास केला असता त्या लोकर्समधे दोन हजार रूपयांच्या स्वरूपात 10 कोटी रुपये मिळाले. यामध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा वरील रक्कम ही 100 रुपयांच्या नोटांमध्ये आहे.
आयकर विभागाकडून आता ही रक्कम कोणाची आहे, याचा तपास सुरु करण्यात आला आहे.
पुण्यातील दिवसभरात दुसरी घटना
राज्यात नव्या नोटा जप्त करण्याचं सत्र सुरुच आहे. पुण्यातल्या वाकडमध्ये एका कारमधून 67 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. 67 लाखांपैकी 62 लाखांच्या नव्या नोटा आहेत. तर उर्वरित रक्कम 100 रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात आहे.
जप्त केलेली कार ही आरपीआयच्या मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष अमित दोषी यांची असल्याचं समजतंय. काल रात्री ही कार मुंबईहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी वाकड चौकात पोलिसांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता कारच्या चालकाने वेगानं कार पळवली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत कार पकडली. कारमधल्या पाचही जणांना ताब्यात घेतलं असून आयकर विभागालाही याची माहिती देण्यात आली आहे.