मुंबई : केरळमध्ये मान्सूनच्या सरी कोसळत असल्या तरी राज्यात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, सावंतवाडी, कुडाळा वेंगुर्ला, देवगड परिसराला पावासाने झोडपून काढलं.
बेळगावातसुद्धा काल मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला. जोरदार पावसामुळे आज सूर्यदर्शन देखील झालं नाही. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीमध्येही पावसाने हजेरी लावली.
विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही भागातही पाऊस पडला. वर्ध्यात मान्सून पूर्व पावसाचं आगमन झालं. प्रचंड तापमानानंतर आज आलेल्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
मात्र हा पाऊस तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकसान देणारा ठरला. कृषी उत्पन्न बाजार समितीत उघड्यावर असलेली हजारो क्विंटल तुरीची पोती पावसात भिजली.
तूर ओली झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला. तर बीडमध्ये काल रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळं उकाड्याने हैराण झालेल्या बीडकरांना दिलासा मिळाला. बीडमधला हा पहिलाच पाऊस असल्याने अनेकांनी भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.