मुंबई: मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा छत्रपती शिवाजी महाराजांवर भव्य-दिव्य सिनेमाची निर्मिती करणार आहे. हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वकांक्षी सिनेमा आहे, असं रितेश देशमुख म्हणाला.


'बीबीसी'शी बोलताना त्याने या सिनेमाबाबतची माहिती दिली.

सिनेमा करताना छत्रपती शिवरायांबद्दल प्रेक्षकांची जी काही भावना आहे, ती संवेदनशीलपणे हाताळण्याकडे लक्ष असले. तसंच शिवाजी महाराजांची प्रतिष्ठा कायम ठेवणं हे मुख्य ध्येय असेल, असं रितेश देशमुखने नमूद केलं.

"हा सिनेमा अशा महान व्यक्तीवर आहे, ज्यांच्यावर केवळ महाराष्ट्रानेच नाही तर संपूर्ण देशाने जीव ओवाळून टाकला आहे. छत्रपती शिवाजी हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वकांक्षी सिनेमा आहे", असं रितेश म्हणाला.

सिनेमाचं बजेट किती?

छत्रपती शिवरायांवरील या मराठी सिनेमाचं बजेट 200 कोटींपेक्षा जास्त असेल, असं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर रितेशचा दिग्दर्शक मित्र राम गोपाल वर्मानेही छत्रपती शिवाजी या सिनेमाचं बजेट 225 कोटी असेल असं ट्विट केलं होतं.

त्याबाबत बोलताना रितेश म्हणाला, "सध्या तरी सिनेमाचा स्क्रीनप्ले/पटकथा निश्चित झाली आहे. आता सिनेमाचं प्री प्रॉडक्शनचं काम सुरु होईल. त्यानंतर सिनेमाचं बजेट ठरवलं जाईल"

बाहुबलीपूर्वीच सिनेमाचा निर्णय

बाहुबली सिनेमामुळे रितेश देशमुख छत्रपती शिवाजी हा सिनेमा करत असल्याचं बोललं जात होतं. मात्र याबाबत रितेश म्हणाला, "बाहुबलीच्या यशामुळे छत्रपती शिवरायांवर मराठी सिनेमा बनवण्याचा निर्णय घेतला नाही, तर बाहुबली येण्यापूर्वी खूप आधीच या सिनेमाचं काम सुरु झालं आहे"

सलमान खानही झळकणार

छत्रपती शिवरायांवरील या मराठी सिनेमात बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानही झळकणार आहे. यापूर्वी सलमान खान रितेश देशमुखच्याच 'लय भारी' या सिनेमातही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.

'बाहुबलीपेक्षा शिवाजी सरस आणि वास्तववादी'

शिवाजी महाराजांची कहाणी बाहुबलीपेक्षा सरस आणि वास्तववादी आहे. त्यामुळे ती प्रेक्षकांना वेगळाच आनंद देईल. शिवाजी महाराज भारताचे शूरवीर सुपुत्र आहेत, ज्यांनी परकीय आक्रमणं परतवून लावत स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांच्या कहाणीमध्ये बाहुबलीपेक्षाही सांगण्यासारख्या खूप गोष्टी असून ती सत्यकथा आहे. त्यामुळे तो एक जबरदस्त अनुभव असेल असं दिग्दर्शक रामगोपाल वर्मांनी म्हटलं होतं.

संबंधित बातम्या

बाहुबलीनंतर रितेशचा भव्यदिव्य 'शिवाजी', राम गोपाल वर्मांकडून ट्विटरवरुन कौतुक  

युगपुरुष 'छत्रपती शिवाजी' लवकरच मोठ्या पडद्यावर, जेनेलिया-रितेशचा मेगा प्लॅन