Prashant Damle Birthday : मराठी नाट्यसृष्टीतल्या दिग्गजांच्या यादीतलं प्रशांत दामले (Prashant Damle) हे एक नाव आहे. मराठी रंगभूमीसह मालिकाविश्व, सिनेसृष्टीतही प्रशांत दामले यांचा वावर आजही कायम आहे आणि तो प्रेक्षकांच्याही तितकाच पसंतीस पडते. गेली 40 वर्ष रंगभूमीची सेवा करणाऱ्या या अवलियाचा आज 63 वा वाढदिवस आहे. प्रशांत दामले यांनी 'टूरटूर' नाटकापासून त्यांचा 'बेस्ट प्रवास' सुरु केला जो आजही सुरुच आहे. त्यांच्या या 40 वर्षांच्या कारकिर्दीची यादी तशी बरीच मोठी आहे. पण या 40 वर्षांमध्ये प्रशांत दामले यांच्यावरील एकही वाद किंवा कोणत्याही चर्चा कधीच ऐकायला मिळाल्या नाहीत हे विशेष.
‘मोरूची मावशी’, ‘गेला माधव कुणीकडे’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘चार दिवस प्रेमाचे’, ‘जादू तेरी नजर’, ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘एका लग्नाची गोष्ट’, ‘सुंदर मी होणार’, ‘कार्टी काळजात घुसली’, ‘संशयकल्लोळ’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘लग्नाची बेडी’, ‘बहुरुपी’, ‘पाहुणा’, ‘सासू माझी ढासू’ ते अगदी अलीकडेच सुरू असलेलं ‘सारखं काहीतरी होतंय’ या नाटकातून प्रशांत दामलेंच्या अभिनयाचा पैलू हा प्रेक्षकांनी अनुभवला. नाटकाप्रती असलेलं त्यांचं प्रेम हे त्यांच्या नावावर असलेल्या विक्रमांमुळे पावलोपावली सिद्ध झालंय. त्यामुळेच नाटकांचे 12,500 प्रयोग करणारा हा विक्रमादित्य प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करतोय.
प्रशांत दामलेंबाबत कधीच कोणतीच कॉन्ट्रव्हर्सी का नाही?
अभिनय क्षेत्रात काम करताना कलाकरांच्या व्यवसायिक तसेच खासगी आयुष्यातबाबतही अनेक चर्चा होतात. कधी कलाकारांच्या अफेअर्सच्या, तर कधी त्यांनी साकारलेल्या भूमिकेच्या. अनेक प्रकारच्या कॉन्ट्रव्हर्सीला सामोरं जावं लागतं. याबाबत प्रशांत दामले यांनी 'सोल सम विथ सारीका' या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं आहे. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, या गोष्टीचं एक रहस्य आहे, ते म्हणजे तुम्हाला काही कळत नाही. मी जे काही करतो ते जगात जावं असं मला अजिबात वाटत नाही. कारण माझं काम जगात जावं असं मला कायम वाटतं. त्यामुळे अफेअर जरी करायचं झालं तरी त्यासाठी वेळ द्यावा लागतो, असं एका लग्नानंत माझ्या लक्षात आलं आहे. मला माझं नाटक टिकवायचं आहे, अफेअर टिकवून काय होणार आहे. नाटक हा माझा आनंद आहे.
प्रशांत दामले यांच्याबद्दल जाणून घ्या...
गेली चार दशके असंख्य मराठी नाटके, चित्रपट, आणि टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. अभिनेते असण्यासोबत ते गायक, पार्श्वगायक आणि नाट्यनिर्मातेही आहेत. विनोदी अभिनयासाठी मराठी नाटक आणि चित्रपट जगतात ते परिचित आहेत.
कलेच्या प्रवासात प्रशांत दामले यांना अनेक प्रतिष्ठीत पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांच्या नावावर पाच लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स आहेत. त्यांनी नाटकाशिवाय 37 मराठी चित्रपट आणि 24 दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले आहे. यात 'आम्ही सारे खवय्ये' या लोकप्रिय मालिकेचाही समावेश आहे. दामले यांना 20 पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, कलारंजन पुरस्कार, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विविध पुरस्कार यांचा समावेश आहे.