निवडीची घोषणा करताना पटोले म्हणाले, 'विधानसभेतील विरोधी पक्ष नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना मान्यता देण्यात यावी अशी विनंती भाजपाने आपल्याकडे केली आहे. त्यामुळे अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मी भाजपाला मान्यता देत आहे. तसेच भाजपाने गटनेते देवेंद्र फडणवीस हे 1 डिसेंबर 2109 पासून विरोधी पक्ष नेते असतील असे मी जाहीर करतो'.
दरम्यान, फडणवीस यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, या दिवसाची मला अपेक्षा नव्हती, मी इथं येईन अस कधीही म्हटलं नव्हत पण आलो. आज मी स्वत:ला भाग्यवान समजतो की, 25 ते 30 वर्षे जे आमच्या विरोधात होते ते मित्र झालेत तर जे मित्र होते ते आज विरोधात बसलेत. मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले
महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली. भाजपकडून किसान कथोरे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर पटोले यांची बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीला काल बहुमत सिद्ध करुन पहिली परीक्षा पास झाल्यानंतर आज विधानसभा अध्यक्षपदाच्या परीक्षेचा सामना करावा लागणार होता. अर्थातच काल 169 मतांनी बहुमत सिद्ध केल्याने विधानसभा अध्यक्षपदाचा 'सामना' देखील महाविकास आघाडीच जिंकणार अशी दाट शक्यता होती. मात्र त्याआधीच भाजपने माघार घेतल्याने पटोले यांची निवड झाली आहे. गुप्त मतदानाने होणारी विधानसभा अध्यक्षाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्याची महाविकास आघाडीची रणनिती असल्याची माहिती मिळाली होती. तसा प्रस्ताव आधी विधानसभेत मांडला जाण्याची शक्यता होती. मात्र आधीच अध्यक्षांची निवड बिनविरोध झाली आहे.
महाविकास आघाडी बहुमत चाचणीत पास
दरम्यान, काल उद्धव ठाकरे सरकारनं बहुमत चाचणी 169 विरुद्ध शून्य अशा फरकानं सिद्ध केलं. विश्वासदर्शक ठरावापूर्वी भाजप आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. यावेळी मनसेचा 1, एमआयएमचे 2 आणि माकपचा एक सदस्य तटस्थ राहिले. भाजपनं मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या शपथविधी आणि अधिवेशनही बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभात्याग केला. मात्र, हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी भाजपचा आक्षेप फेटाळून लावला. या बहुमताच्या चाचणीनंतर महाविकास आघाडीच्या सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांचे आमदार आणि इतर अपक्ष मिळून यांचं संख्याबळ 170 च्या जवळ होतं, त्यातली 169 मतं महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने पडली. आता विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे.