Manoj Jarange Patil Bombay High Court Hearing : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनासंदर्भात आज (२ सप्टेंबर) पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडत आहे. न्यायालयाने या प्रकरणावर पुन्हा एकदा आज दुपारी ३ वाजता पुढील सुनावणी होणार असल्याचं सांगितलं होतं. त्याआधी राज्य सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी स्पष्ट भूमिका न्यायालयाने मांडली आहे. आज दिवसभरातील दुसऱ्या सुनावणीवेळी न्यायालयाने सरकारचे कान उपटले आहेत. तुम्ही आधीच कोर्टात यायला हवं होतं. ही तुमची चुकी आहे, असं म्हणत कोर्टाने सरकारची खरडपट्टी काढली आहे. तुम्ही देखील आमच्या आदेशाच उल्लंघन केलं. 50 हजारांपेक्षा जास्त लोक होती, तोवर तुम्ही काय करत होता असा सवाल उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.
कोर्टाने सरकारवर ओढले ताशेरे
तुम्ही जर 24 तासांनी संतुष्ट नव्हता तर तुम्ही देखील कोर्टात यायला हवं होतं, उच्च न्यायालयाने आंदोलनकर्त्यांच्या वकिलांना बजावलं. ३१ मे ला आम्ही पहिला अर्ज केला, २५ जुलैला दुसरा अर्ज केला. त्यानंतर आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक केली. मात्र आम्हाला गाड्या पार्क करायला जागा दिली नाही, आता तुम्ही म्हणू शकत नाही की पूर्वकल्पना दिली नाही ही भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे. याबाबत आपली मनोज जरांगे यांची भूमिका मांडताना सतीश मानेशिंदे म्हणाले, आम्ही लोकांना ठिकाणं खाली करण्यास सरकारला सहकार्य करण्यास आणि गाड्या काढण्यास सांगितलं आहे. कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचं आवाहन करण्यात आलं आहे.जे लोक आंदोलनात भाग घेण्यासाठी आले आहेत त्यांनी शहरातून बाहेर जाण्यास सुरूवात केल्याचं वकिलांनी सांगितलं आहे. उद्यापर्यंत सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.
सरकारी वकील काय म्हणाले?
या सुनावणीत ज्येष्ठ विधिज्ञ बिरेंद्र सराफ यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. त्यांनी म्हटले की, आझाद मैदानाच्या परिसरात मराठा आंदोलक थांबले तर अडचण निर्माण होईल. आम्ही अद्याप कोणतीही कठोर कारवाई केली नाही. मनोज जरांगे यांनी लिखित स्वरुपात किंवा लोकांना आवाहन करुन आंदोलनकर्त्यांना मुंबई सोडायला सांगावी. जरांगे पाटील यांना नोटीस देण्यात आली असून आम्ही त्यांना आझाद मैदानाची जागा खाली करायला सांगितले आहे. आम्ही सगळीकडे बॅनर्स लावून सूचना दिल्या आहेत. त्यानंतर आंदोलकांची संख्या कमी झाली आहे. काही भागात अजूनही मोठ्याप्रमाणावर वाहने आहेत. काही लोक ऐकत आहेत, तर काही लोक अजिबात ऐकत नाहीत. काल रात्रीपासून पोलीस रस्त्यावर असून आंदोलनकर्त्यांना विनंती करत आहेत, असे राज्य सरकारकडून कोर्टात सांगण्यात आले.