Eknath Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईयात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने जळगावात मोठी खळबळ उडाली आहे. एका केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य मुलींचे काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे (Eknath Khadse) चांगलेच आक्रमक झाले आहेत.
या प्रकारावर एकनाथ खडसे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, हे दुर्दैव आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरात अशा घटना वारंवार घडत आहेत. याआधी अशा अनेक घटना या परिसरात घडलेल्या आहेत. परंतु, मुली पोलीस स्टेशनला यायला घाबरतात. मुलींची सुरक्षितता ही फार अवघड बाब आहे. मी माझ्या नातीला सांगितलं की, तू स्वतः जाऊन तक्रार कर. आपण घाबरता कामा नये.
त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे संरक्षण
रक्षाताई देखील या संदर्भात पोलिसांशी बोलल्या आहेत. मी स्वतः पोलिसांशी बोललो आहे. हे लोक गुंड आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोरींचे त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्याचवेळी पोलिसांनी त्याला अडवलं होतं. पण त्यांनी पोलिसांना देखील मारहाण केली. पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पण ते जामिनावर सुटले. त्यांची इतकी हिंमत होते की ते पोलिसांना देखील मारहाण करातात. इतके गुंड याठिकाणी पसरलेले आहेत आणि इथे त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे संरक्षण आहे, असे त्यांनी म्हटले.
दोन दिवस कारवाई नाही
याबाबत रोहिणी खडसे एबीपी माझाशी बोलताना म्हणाल्या की, राज्यात गुंडागर्दी, दडपशाही हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. ही शोकांतिका म्हणावी लागेल की, हे गुंडागर्दी करणारे ज्यांची तक्रार केंद्रीय मंत्र्यांना जाऊन करावी लागते. ते एका महायुतीच्या आमदारांचेच कार्यकर्ते आहेत. त्यांच्याकडूनच हे मिळालेले पाठबळ आहे. त्यामुळे गेले दोन दिवस तक्रार केल्यानंतरही त्यांच्यावर कारवाई केली गेलेली नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीवर छेडछाडीचे प्रकार होत आहेत आणि त्यांच्या महायुती सरकारच्या एका लोकप्रतिनिधीच्या दबावाखाली कारवाई केली जात नाही. गुंडांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करत आहे. मुलगी कोणाचीही असली तरी ती मुलगी आहे. हा विचार करून कारवाई होणे अपेक्षित असते. परंतु दोन दिवस कारवाई होत नसेल तर त्याचा निषेध आहे, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा