Congress President Election: आज काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (Voting Prepration) मतदान केले जाणार आहे. मतदानासाठी देशभरातील 40 केंद्रांवर 68 बूथ स्थापन करण्यात आले आहेत. जेथे आज सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. राज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडेल.  


काँग्रेस अध्यक्षपदासाठी सुमारे 9800 मतदार (राज्य प्रतिनिधी) आहेत. जे मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर या दोन उमेदवारांपैकी एकाला मतदान करतील. सोनिया गांधी, मनमोहन सिंग, प्रियंका गांधी यांच्यासह सीडब्ल्यूसीचे सदस्य काँग्रेस मुख्यालयातील बूथवर मतदान करतील. तर राज्यात प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे मतदानाचे केंद्र असून तीन बूथवर सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत राज्यातील 561 प्रदेश प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावू शकतात. या निवडणुकीसाठीचे प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश कुमार, नरेंद्र रावत, कृष्णा पुनिया हे मतपेट्या घेऊन मुंबईत आले आहेत. 


या निवडणुकीत भारत जोडो यात्रेच्या शिबिरात एक बूथ तयार करण्यात आला असून तेथे राहुल गांधी आणि सुमारे 40 मतदार मतदान करणार आहेत. मल्लिकार्जुन खरगे बेंगळुरू येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात आणि शशी थरूर तिरुअनंतपुरममध्ये मतदान करणार आहेत. मतदानानंतर मतपेट्या दिल्लीत आणल्या जातील, जिथे पक्षाच्या मुख्यालयात 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल आणि निकाल घोषित केले जातील. काँग्रेस अध्यक्षपदासाठी तब्बल 22 वर्षांनंतर निवडणूक होत असून तब्बल 24 वर्षांनंतर पक्षाची धुरा गांधी घराण्याबाहेर जाणार आहे.


137 वर्षांत सहाव्यांदा अशी स्पर्धा 


जवळपास 137 वर्षे जुन्या काँग्रेस पक्षात सहाव्यांदा पक्षाच्या या महत्त्वाच्या पदासाठी योग्य उमेदवार कोण, हे निवडणुकीच्या प्रक्रीयेतून ठरणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत गांधी घराण्यातील एकही सदस्याने भाग घेतला नाही. म्हणजेच यावेळी काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी घराण्यातील बाहेरचा सदस्य होणार, हे आधीच निश्चित झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, काँग्रेसच्या 137 वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदासाठी सहाव्यांदा अंतर्गत निवडणुका होत आहेत. जयराम रमेश म्हणाले की, माध्यमांनी 1939, 1950, 1997 आणि 2000 या वर्षांची चर्चा केली आहे. परंतु 1977 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठीही निवडणूक झाली होती. जेव्हा कासू ब्रह्मानंद रेड्डी निवडून आले.