मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणूक यंदा काही मतदारसंघात चांगलीच रंगत पाहायला मिळाली. तर, महाविकास आघाडीच्या जागावाटपत सर्वात डोकेदुखी आणि वादाची जागा म्हणजे सांगली लोकसभा (Sangli Losabha) मतदारसंघ होता. कारण, या मतदारसंघातून शिवसेनेनं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस आणि शिवसेनेत काहीसा वाद रंगला होता. मात्र, उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश झाल्यानंतर अप्रत्यक्षपणे उमेदवारी जाहीर केली होती. तर, पुढील काही दिवसांत अधिकृत उमेदवार म्हणूनही घोषणा केली. त्यामुळे, काँग्रेसच्या जागेवर इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांची नाराजी झाली. मात्र, विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला. विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या पाठिशी विश्वजीत कदम (Vishwajeet kadam) ठामपणे उभे राहिले. निवडणूक निकालानंतर पाटलांची विशाल जीत झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, या विजयानंतर उद्धव ठाकरे हे आम्हाला वडिलस्थानी आहेत, त्यांनी आम्हाला पदरात घ्यावं, असं विश्वजीत कदम यांनी एबीपी माझावरील माझा कट्टामध्ये बोलताना म्हटलं आहे. 


सांगलीतील जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेत वाद रंगला होता. अखेर दिल्ली दरबारी हा वाद संपुष्टात आला. मात्र, विशाल पाटील यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली. त्यामुळे, सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळाली. शिवसेनेच्या तिकीटावर चंद्रहार पाटील यांनी निवडणूक लढवली. तर, भाजपच्या संजय काका पाटील यांचे त्यांना आव्हान होते. मात्र, येथील जागेवरुन दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनीही अपक्ष खिंड लढवली. दरम्यान, विश्वजीत कदम यांनी पडद्यामागून विशाल पाटील यांना मदत केली. 4 जून रोजी लागलेल्या निकालामुळे पाटलांच्या विशाल जीतमागे विश्वजीत ठामपणे उभे राहिल्याचं दिसून आलं. विशाल पाटील 1 लाख 1 हजार 94 मतांनी विजयी झाले. मात्र, या निकालामुळे एकप्रकारे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं उघड झालं. त्यामुळे, शिवेसना पक्षाच्या नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे. संजय राऊत यांनी प्रचारात ते बोलूनही दाखवले होते. मात्र, महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर आता हा विरोध काहीसा मावळला आहे. त्यातूचन आपण लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेणार असल्याचं विश्वजीत कदम व विशाल पाटील यांनी म्हटलं आहे. 



उद्धव ठाकरे आम्हाला वडिलस्थानी


शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल आम्हाला आदर आहे, संपूर्ण महाराष्ट्राला कै. बाळासाहेबांबद्दल आदर आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. सध्याच्या राजकारणात ते ज्या संघर्षातून महाराष्ट्राचं राजकारण करत आहेत, त्यांना मानलंच पाहिजे. आमच्यासाठी महाविकास आघाडीचे ते नेते आहेत. पण, मी म्हणतो नेत्यापेक्षा ते आमच्यासाठी वडिलस्थानी आहोत. आम्ही दोघंही त्यांच्या मुलासारखे आहोत. कदाचित काही समज-गैरसमज असतील. पण, आम्ही त्यांचे आशीर्वाद मागत आहोत, त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, पदारात घ्यावे, असे म्हणत लवकरच मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद घेणार आहोत, असे विश्वजीत कदम यांनी म्हटले. त्यामुळे आम्ही मातोश्रीवर जाऊन लवकरच त्यांची भेट घेणार आहोत, त्यांचे आशीर्वाद घेणार आहोत. त्यासाठी, आम्ही वेळ मागितली आहे, असा गौप्यस्फोट विश्वजीत कदम यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.


म्हणून मी निवडणूक लढवली - पाटील


निश्चितच उद्धव ठाकरेंना भेटावं लागणार आहे, आम्ही दिल्लीत गेलो तेव्हा महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर आम्ही संजय राऊत यांची भेट घेतली. त्यावेळी, त्यांनीही हा विषय संपल्याचं म्हटलं. कारण, विशाल पाटील हे काँग्रेस परंपरेचे आहेत, म्हणजे आपल्या महाविकास आघाडीचेच आहेत. त्यामुळे, हा विषय आता संपल्याचं त्यांनी म्हटलं, अशी माहिती विशाल पाटील यांनी दिली. माझी लढाई माझ्या पक्षाची, माझ्या वैयक्तिक अस्तित्वाची होती. त्यामुळे ही लढावं लागणार होती, कारण भाजपचा पराभव करणे आवश्यक होते, असे विशाल पाटील यांनी म्हटले.