सांगली : उद्यापर्यंत सांगलीचा (Sangli Lok Sabha Election) काहीतरी निर्णय होईल, आम्हाला काही टेन्शन नाही असं सूचक वक्तव्य काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी केलंय. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद सुरू असून ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. 


विशाल पाटील-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संवाद टाळला


सध्या रमजान महिना सुरु असल्याने मुस्लिम बांधव रमजानचा उपवास धरत असतात. अशातच लोकसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. सांगलीतील बदाम चौक येथील गुलकंद ग्राउंड येथे पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने दावत ए इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष संजय बजाज यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. मात्र विशाल पाटील आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांशी संवाद साधने टाळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 


सांगलीचा वाद विकोपाला 


सांगली मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातला वाद विकोपाला गेला आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवरुन मागे हटत नाही आणि काँग्रेसही सांगलीच्या जागेवरचा दावा सोडायला तयार नाही. त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्येच जाहीर शाब्दिक युद्धाला सुरुवात झाल्याचं दिसतंय. 


संजय राऊतांनी सांगलीत जात विश्वजीत कदमांवर गंभीर आरोप केला. तर विश्वजित कदम आणि विशाल पाटलांवर खासदार संजय राऊत यांनी सांगलीत केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध केला. राऊतांची अशी वक्तव्य खपवून घेणार नाही असा इशारा पत्रातून देण्यात आला.'


विश्वजित कदमांनी प्रतिष्ठा पणाला लावली


तर दुसरीकडे सांगलीच्या जागेसाठी विश्वजीत कदमांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचं दिसतंय. संजय राऊत सांगलीत येतात विश्वजित कदमांनी दिल्ली गाठली आणि पुन्हा एकदा वरिष्ठांची भेट घेतली.


शनिवारी संजय राऊतांनी जिल्ह्याच्या विविध भागात जात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यात त्यांनी विश्वजित कदम आणि विशाल पाटलांवर जोरदार टीकाही केली. मात्र दौऱ्यावर असताना संजय राऊतांनी पतंगराव कदमांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं. तसेच विश्वजीत कदम यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केली. या चर्चेनंतर संजय राऊत यांनी अचानक सामोपचारी भूमिका घेतली आणि तुटेपर्यंतच ताणावं असं कोणालाच वाटत नाही असं राऊत यांनी स्पष्ट केलं. 


सांगलीत मैत्रिपूर्ण लढतीचा प्रस्ताव


दरम्यान, सांगली आणि भिवंडीत मैत्रिपूर्ण लढत व्हावी, तोच शेवटचा पर्याय असल्याचं काँग्रेसचे नेते अनिस अहमद यांनी सांगितलं आहे. तसा प्रस्ताव त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिल्याची माहिती आहे. पण जर सांगलीत मैत्रिपूर्ण लढत दिली तर त्याचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्रात दिलं जाईल असं प्रत्युत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलं.


ही बातमी वाचा: