Vijay Wadettiwar on Manikrao Kokate : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा मोबाईलमध्ये रमी खेळतानाचा व्हिडीओ 'एक्स'वर शेअर केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, हे नत भ्रष्ट सरकार आहे. हे जनतेच्या बोकांडी बसलेलं नतभ्रष्ट सरकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असं सरकार पुन्हा होणार नाही. कोणाचीच पर्वा नसलेलं हे सरकार आहे. शेतकरी कर्जाखाली दबलेला आहे. आठ ते दहा शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत. मत घेण्यासाठी एक रुपयात विमा आता मात्र तुमचं तुम्ही बघा, अशी भूमिका सरकार घेत आहे.

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? 

भाजपवाल्यांनी कोकाटे यांना केवळ नावालाच मंत्री केलंय. त्यामुळे त्यांना काम उरलेले नाही, म्हणून ते रमी खेळत आहे किंवा अधिकार नसल्यामुळे त्यांना काही करायची इच्छा नसेल. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? अशी अवस्था झाली आहे. चड्डी-बनियान, लुंगी-बनियानवाले मंत्री... गुंडांना सोबत घेणारे आमदार, काय चाललंय महाराष्ट्रात? वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांना या पदावर ठेवायचं की नाही? याचा निर्णय मुख्यमंत्री यांनी घ्यावा. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांबद्दल काही वाटत असेल तर अशा मंत्र्यांना ते त्या पदावर ठेवावं का? हा विचार मुख्यमंत्री करतील, असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

रोहित पवारांचा माणिकराव कोकाटेंवर हल्लाबोल

दरम्यान, रोहित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. रोहित पवार यांनी म्हटले आहे की, जंगली रमी पे आओ ना महाराज! सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही. म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची   “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा कर्जमाफी द्या, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Sanjay Raut : अमित शाहांनी महाराष्ट्रातील चार मंत्र्यांना डच्चू देण्याचं ठरवलंय, त्यात माणिकराव कोकाटेंचंही नाव; संजय राऊतांचा मोठा दावा