Vijay Wadettiwar on separate Vidarbha: वेगळा विदर्भ झाल्याशिवाय विदर्भाचा विकासाचा अनुशेष भरुन काढणे शक्य नाही. त्यामुळे भविष्यात वेगळा विदर्भ झालाच पाहिजे, असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले. वेगळा विदर्भ आम्हाला हवाय कारण आताच्या सामाजिक समीकरणानुसार विदर्भात ओबीसी, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचं प्राबल्य राहिले आहे. विदर्भात मिश्र समाज आहे. या समाजांच्या दृष्टीकोनातून आपण पाहिलं तर या लोकांना सत्तेत फार कमी संधी मिळाली आहे. जोपर्यंत सत्तेत सहभागी होत नाही, तोपर्यंत त्या भागाला न्याय दिला जाऊ शकत नाही. त्यामुळे भविष्यात वेगळा विदर्भ (Separate Vidarbha) झाला पाहिजे, ही आमची मागणी असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. ते सोमवारी एबीपी माझाच्या 'माझा व्हिजन' या कार्यक्रमात बोलत होते.
सरकारला गुण द्यायचे असतील तर सरकारने आधी परीक्षा तर दिली पाहिजे. सरकारच्या कामाची पातळी पास होण्याइतकीही नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही तर कुव्यवस्था आहे. मुख्यमंत्र्यांना दिल्लीचे वेध लागले असतील म्हणून त्यांचं महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होत असेल. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. जर विदर्भाचे मजबूत मुख्यमंत्री राज्याला मिळाले तर मग विदर्भातील तरुणांचा लोंढा कामासाठी अजूनही पुणे-मुंबई-हैद्राबाद-बंगळुरूकडे का जातोय?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. महामुंबईच्या प्रोजेक्टसाठी दिलेले पैसे आणि विदर्भाच्या अनुशेषासाठी दिलेले पैसे यात किती तफावत आहे? मुख्यमंत्री जरी विदर्भाचे असले तरी मंत्रिमंडळावर प्राबल्य त्यांचं नाही. मराठा समाजाचं मंत्रिमंडळात प्राबल्य आहे, असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
या राज्यात तार्टी, बार्टी, महाज्योती आणि सारथी अशी चार महामंडळे विविध समाजाच्या लोकांसाठी तयार करण्यात गेली. कुठल्याही निधीचे वाटप होताना समान व्हायला पाहिजे की लोकसंख्येच्या आधारे व्हायला पाहिजे? जर राज्यात ओबीसी समाज 40-45 टक्के आहे, पण आम्हाला 300 कोटी मिळतात. पण मराठा समाज 16 टक्के असून सारथीला 300 कोटी मिळत असतील, 13 टक्के आणि 9 टक्के असलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना 300 कोटी मिळत असतील तर हा ओबीसींवर अन्याय नाही का?, असा सवालही विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
Vijay Wadettiwar: जेलमध्ये जाईन पण भाजपमध्ये जाणार नाही: विजय वडेट्टीवार
विदर्भाचा अनुशेष जर कमी करायचा असेल तर वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही. मराठा आणि ओबीसी समाजामधे निधीवाटपावरून मोठी तफावत आहे. लोकसभेत आम्ही 13 जागा जिंकल्या आणि राज्यात रेवडीचा कार्यक्रम सुरू झाला. लोकसभेत जागा कमी आल्या म्हणून सरकारकडून लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले. प्रचारामुळे वगैरे मतं मिळत नसतात. सरकारच्या कामगिरीवर लोक खुष असते तर त्यांना लाडक्या बहिणींना पैसेवाटप करावे लागले नसते. मतपत्रिकांवर मतदान घ्या मग कळेल जनता कुणाच्या बाजूने आहे. जो आक्रमक असतो त्याला बदनाम करणाऱ्या टोळ्या सक्रिय होतात. मी नेहमीच सुधीरभाऊंना म्हणत असतो. मी गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या पदांवर काम करतो आहे. आमदार, मंत्री, विरोधी पक्षनेता वगैरे कशाला मी विचार करू. सध्यातरी मी कुठल्याच सापळ्यात नाही, मला कुणीही पकडणार नाही. पुन्हा काही नव्याने षडयंत्र झाले, एजन्सीजचा वापर झाला तर सांगता येत नाही. माझं नाव पक्ष बदलणाऱ्यांच्या यादीत येणार नाही. जेलमधे जाईन पण भाजपमधे जाणार नाही, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
आणखी वाचा