मुंबई : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आतापर्यंत 12 जागांसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये चंद्रपूर (Chandrapur) मतदारसंघाचाही समावेश आहे. या जागेवर भाजपाने प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना उमेदवारी दिलीय. या जागेवर मुलगी शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांना तिकीट मिळावे, यासाठी विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्याकडून प्रयत्न चालू होते. त्यासाठी त्यांनी दिल्लीच्या नेत्यांशीही बातचित केली. मात्र शेवटी या जागेवर प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांना तिकीट देण्यात आहे. त्यानंतर आता याच प्रतिभा धानोरकर यांच्याविषयी वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते.


माझं नाव गडबडीत विसरल्या असाव्यात 


चंद्रपूरसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रतिभा धानोकर यांचे नागपुरात जोरदार स्वागत करण्यात आले. विमानतळावर उतरल्यानंतर प्रतिभा धानोकर यांनी काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. मात्र यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार यांचे नाव घेतले नाही. यावर धानोरकर वडेट्टीवार यांच्यावर नाराज आहेत, का असा प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, धानोरकर गडबडीत माझं नाव विसरल्या असाव्यात. नाव घेणं गरजेचे नाही. यामुळे फारसा फरक पडत नाही. नाव घेतलंच पाहिजे असं नाही, अशा भावना वडेट्टीवार यांनी व्यक्त केल्या. 


शेवटी हायकमांडचा निर्णय अंतिम असतो 


धानोरकर यांच्या प्रचाराला जाणार की नाही, असा देखील प्रश्न वडेट्टीवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, प्रचारासाठी जिथं जाता येईल मी तिथं जाणार आहे. शक्य होईल तिथे सगळीकडे जाणार. पक्षाने जो निर्णय घेतला त्याचं मी स्वागत करतो. उमेदवारी मागण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. हाच अधिकार शिवानी वडेट्टीवार यांनादेखील होता. हायकमांडचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे काहीही अडचण नाही. शेवटी पक्षाच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी मी जाणार आहे. शक्य होईल तिथे मी जाणार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले. 


तिकीट देताना भाजपला घाम फुटला 


तसेच त्यांनी पुढे बोलताना भाजपवरही टीका केली. भाजपने इच्छूक नसणाऱ्यांनाही तिकीट दिले आहे. उमेदवारांच्या गळ्यात जबरस्तीने वरमाला टाकण्यात आली आहे. तिकीट देताना भाजपला घाम फुटला आहे. यातून भाजपची महाराष्ट्र तसेच विदर्भातील दयनीय अवस्था दिसते, असं मत वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.


हेही वाचा >>


भान राखून विचारांची लढाई विचाराने लढू, प्रणिती शिंदेंनी राम सातपुतेंना डिवचलं; खुल्या पत्राची चर्चा!


प्रणिती शिंदेंच्या खुल्या पत्राला राम सातपुतेंचे 'जय श्रीराम'ने उत्तर; सोलापुरातील राजकीय धुळवडीची चर्चा!