Vijay Wadettiwar on Santosh Deshmukh Case : सर्वांर्थाने सक्षम असलेली आमची पोलीस यंत्रणा बीड प्रकरणात कुचकामी होताना दिसतेय, याचं फार वाईट वाटतंय. बीडच्या संदर्भात कुठल्याही दबावाला बळी न पडता या प्रकरणाचा तपास झाला पाहिजे. तळापर्यंत जाऊन सर्व आरोपींचा शोध घेतला पाहिजे. मुळात या प्रकरणातील सर्व आरोपींची उठबस ही मंत्र्यांसोबत होती, असे अनेक पुरावे आहेत. त्यांच्यात जवळीक असून त्यांच्या घरात यांच्या वावर होता. हे सगळं होतं असताना ते आज म्हणताय की संबंध नव्हते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावरून सडकून टीका केली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर ते नागपूर येथे बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी बीड म्हणजे बिहारलाही लाजवेल अशीच बीडची परिस्थिती असल्याची टीका ही त्यांनी केली आहे.
बीड म्हणजे बिहारलाही लाजवेल असेच बीडचे चित्र- विजय वडेट्टीवार
बीड सारख्या जिल्ह्यात नेमणूक करणारे पोलीस हे तेथील मंत्र्यांच्या मर्जीने होतात. तिथे निर्णय घेणारे सर्व निर्णयकर्ते यांच्याच मर्जीने नेमले जातात. अनेक बीडचे अधिकारी जेव्हा आमच्याकडे चंद्रपूरला येतात तेव्हा ते सांगतात, की साहेब इतके काम करण्याची गरज नाही. 30-40 टक्के काम केलं तरी पुरे आहे. म्हणजे बीडमध्ये जो काही निधी मिळतो त्यातील निम्मे पैसे सर्व यंत्रणा आणि राजकीय नेते मिळून वाटप करून घेतात. म्हणून कॅगच्या अहवालात ही माहिती पुढे येते त्यात जवळपास 96 हजार कोटींची कामे मिळेनाच झाली आहे. यातील अधिकाधिक कामे ही एकट्या बीड जिह्यातील आहे. 20-30 टक्के टक्केवारी दिल्याशिवाय अवघ्या पाच लाखांचे कामही कोणी करू शकत नाही. म्हणजेच खंडणी, गुन्हेगारी आणि त्यातून अर्थकारण फिरतंय. हे सर्व पाहता बीड म्हणजे बिहारलाही लाजवेल अशीच बीडची परिस्थिती असल्याची घणाघाती टीका ही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल
बीडच्या केज तालुक्यातील मसाजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1) जयराम चाटे, 2)महेश केदार 3) प्रतीक घुले आणि 4)विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती तर सुदर्शन घुले, सुधीर सांगळे या दोन आरोपींना रात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता कृष्णा आंधळे हा एक आरोपी फरार आहेत. त्याच्या अटकेसाठी विशेष पथक मागावर आहे.
हे ही वाचा