Baramati Lok Sabha Election : अजित पवारांचे (Ajit Pawar) कट्टर विरोधक विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी पवार कुटुंबियांविरोधात दंड थोपटले आहेत. मी बारामती लोकसभा निवडणूक लढणार असल्याची मोठी घोषणाच विजय शिवतारे यांनी केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या पुरंदरचे आमदार असलेल्या विजय शिवतारेंनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणाच करून टाकली आहे. यासंदर्भात बोलताना चिन्ह कोणतं असेल, हे अद्याप अस्पष्ट आहे, पण मी आगामी लोकसभा लढवण्यावर ठाम असल्याचं शिवतारे यांनी म्हटलं आहे.
विजय शिवतारे म्हणाले की, "सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात मी बारामती लोकसभा निवडणूक लढणार आहे. 5 लाख 80 हजार मतदार पवार कुटुंबियांच्या विरोधात आहेत, त्यांच्यासाठी मी पर्याय आहे. अजित पवारांच्या प्रवृत्ती विरोधात आणि सुप्रिया सुळेंनी पंधरा वर्ष काहीच काम केलं नाही, म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात उभा असेन, असं शिवतारे म्हणाले आहेत.
चिन्ह कोणतं असेल, हे अस्पष्ट; पण निवडणूक मी लढणारच : विजय शिवतारे
चिन्ह कोणतं असेल, हे अद्याप अस्पष्ट आहे, पण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार यावर मी ठाम आहे आणि यासंदर्भात मी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहे, असंही विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही, शिवतारेंची पवार कुटुंबीयांवर तोफ
रविवारी एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर तोफ डागली. सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ विजय शिवतारेंचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा असल्याचं शिवतारे यांनी जाहीरपणे म्हटलं. तसेच, अजित पवार त्या अपमानासाठी इथे येऊन माफी मागणार का? असा प्रश्नही शिवतारे यांनी उपस्थित केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसल्याचा म्हणत, पवार कुटुंबीयांवर शिवतारे यांनी यावेळी निशाणा साधला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल 5 लाख 80 हजार मतदार असलयाचा दावा केला. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णयही शिवतारे यांनी घेतला आहे. तसेच, आता गुलामगिरी करणार नसल्याचा इशारा शिवतारे यांनी दिला आहे. अशातच येणाऱ्या लोकसभेत दोन पवार विरुद्ध विजय शिवतारे आशी लढाई होणार का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी : अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आलीय, विजय शिवतारेंनी दंड थोपटले