मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांपूर्वी महायुतीमध्ये बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. कारण, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात विधानसभेच्य जागांवरुन मतभेद असल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी आंबेगाव मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी येथील विधानसभा निवडणुकीवर भाष्य करताना, मी नाईलाजस्तव विधानसभा लढवणार असल्याचं म्हटलं. त्यानंतर, येथील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने ही जागा आम्हाला मिळावी, यासाठी भूमिका मांडली. शिंदे गटाच्या नेत्याने येथील जागेवर दावाही केला. त्यानंतर, आता दोन दिवसांपूर्वी अजित पवारांसोबत मुंबईतील कार्यक्रमात भाषण केलेल्या आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे, पूर्व जागेवरही शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने दावा केला आहे. त्यामुळे, महायुतीत बिघाडी होत असल्याचं उघड होत आहे. येथील शिवसेनेचे कुणाल सरमळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून येथील जागेवर मला संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. 


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वांद्रे पूर्व विधानसभा जागेवर शिवसेनेचे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांनी उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलं आहे. या विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे झिशान सिद्धिकी हे आमदार आहेत. विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. कारण, अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमात झिशान सिद्दीकी हे अजित पवारांच्या स्टेजवर दिसून आले. तर, त्यांनी भाषणही केलं. तर, येथील मतदारसंघात अजित पवारांनी शक्तीप्रदर्शन केलं होतं. त्यावेळी, ज्या जागेवर सिटिंग आमदार आहेत त्या जागा सोडून जागा वाटपावर चर्चा केली जाईल अशी प्रतिक्रिया दिली होती. अशात वांद्रे पूर्व विधानसभेची उमेदवारीसाठी कुणाल सरमळकर यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहिल्याने जागांबाबत महायुतीत रस्सीखेच पहायला मिळत आहे.


करमाळकर यांनी पत्रात काय म्हटलं?


शिवसेना पक्षासंदर्भात आपण घेतलेल्या योग्य निर्णयानंतर मी दिनांक 28 जुलै 2022 रोजी उद्धव ठाकरे गट सोडत शिंदे गटात प्रवेश केला. मागील प्रत्येकी म्हणजे दोन वर्षाचे अहवालाचे आपल्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रवेश केल्यापासून आतापर्यंत वांद्रे (पूर्व) विधानसभा, वांद्रे (पश्चिम) विधानसभा, विलेपार्ले विधानसभा येथे प्रत्येकी 6 वॉर्ड असे 18 वॉर्डमध्ये शाखा स्थापन केल्या. वांद्रे पूर्व विधानसभेत 6 शाखा तसेच प्रभाग क्र.87 मध्ये एक, प्रभाग क्र.92 मध्ये एक, प्रभाग क्र.94 मध्ये दोन, प्रभाग क्र.95 मध्ये एक, प्रभाग क्र.96 मध्ये एक असे 6 जनसंपर्क कार्यालय स्वखर्चाने बनविण्यात आले. या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेसाठी सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करण्यात आले. विशेष करुन लाडकी बहिण योजनेचे सफलतापूर्वक नियोजन जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आल्याचेही कुणाल सरकमळकर यांनी पत्रात म्हटले आहे. 


मुस्लिम बहुल असलेल्या प्रभाग क्र.92 व 96 मध्ये प्रत्येकी एक-एक जनसंपर्क कार्यालय खोलून जनतेशी संवाद, सणासुदीला दुध-फळ तसेच आर्थिक पाठबळ देत काँग्रेसचे बळ असलेल्या प्रभागात मोठ्या प्रमाणात घुसखोरी केली आहे. तसेच हिंदूचे सण राबविणे. दहिहंडी उत्सव, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, दिपोत्सव, साई पालख्या व भंडारे, क्रिकेट, कबड्डी, फूटबॉल यासारख्या सण व क्रीडा स्पर्धांना आर्थिक पाठबळ दिले. प्रत्येक सणांचे शुभेच्छा बॅनर तसेच मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे महाराष्ट्र हिताचे निर्णय असलेले बॅनर प्रत्येकवेळी मातोश्रीच्या अंगणात लावून प्रत्येक क्षणाला उबाठा गटाला अंगावर घेण्याचे कार्य सतत माझ्या हातून घडत आहे, अशी आपल्या कामांची व शिवसेना शिंदे गटासाठी केलेल्या कार्याची यादीच पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. त्यासोबतच, आगामी विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्व विधानसभेत आपल्या पक्षाकडून उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणीही कुणाल सरमळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केली आहे. त्यामुळे, महायुतीत खटका उडण्याची चिन्हे असल्याचे दिसून येते.