बदलापूर: अवघ्या चार वर्षांच्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्यानंतर बदलापूरमध्ये मंगळवारी उग्र आंदोलन झाले होते. या आंदोलकांनी विकृत घटना घडलेल्या शाळेची तोडफोड केली होती. तसेच आंदोलकांच्या एका जमावाने बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर उतरत वाहतूक रोखून धरली होती. तब्बल 10 तास सुरु असलेल्या या आंदोलनावेळी राज्य सरकार आणि पोलिसांविरोधात प्रचंड रोष दिसून आला होता. मात्र, भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आता या आंदोलनाबाबत काही धक्कादायक आरोप केले आहे. चित्रा वाघ आणि भाजपचे स्थानक आमदार किसन कथोरे यांनी बुधवारी बदलापूर पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित घटनेची आणि कालच्या आंदोलनाची माहिती घेतली. यानंतर  प्रसारमाध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी आंदोलकांवर गंभीर आरोप केले.


चित्रा वाघ यांनी आंदोलकांच्या हेतूबाबत शंका व्यक्त केली. राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर मार्गाने शक्य त्या सर्व गोष्टी केल्या. मी आज पोलीस ठाण्यात जाऊन कालच्या आंदोलनाबाबत माहिती घेतली. स्थानिक आमदार किसन कथोरे (Kisan Kathore) यांच्याशी बोलले. हे आंदोलक कुठून आले होते, याबद्दल विचारणा केली. बदलापूरमधील (Badlapur) काही महिलांनी मला सांगितले की, चित्राताई, सकाळी 10 वाजेपर्यंत बदलापूरमधील लोकांनी आंदोलन केले. त्यानंतर त्यानंतर माहिती नाही कुठून लोकं आली, कशी लोकं आली. हा जमाव अचानक आला. कोण शाळेत घुसलं, एक लोंढा रेल्वे ट्रॅकवर गेला. या सगळ्यांनी आमच्या बदलापूरला बदनाम करुन टाकलं, असे काही महिलांनी आपल्याला सांगितल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला.


झालेली घटना दुर्दैवी आहे. पण आंदोलनकर्त्यांच्या हातात, 'लाडकी बहीण योजना रद्दा करा', असे फलक का होते? मला कळलंच नाही, विषय कुठला होता आणि या लोकांच्या हातात असे बॅनर्स का होते? यापैकी काही आंदोलकांची चौकशी केली तेव्हा कोण चेंबुरहून आले होते, कोण नवी मुंबईतून आले होते, कोण ठाण्याहून आले होते, असे चित्रा वाघ यांनी सांगितले. या सगळ्यानंतरही आमचे दीपक केसरकर आणि गिरीश महाजन हे दोन मंत्री तिकडे गेले होते. आम्ही फेसबुकवरून सरकार चालवणारे नाही, आमचं सरकार फिल्डवर उतरणारं आहे, असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला.


पोलिसांना गु्न्हा दाखल करण्यासाठी वेळ का लागला? चित्रा वाघ यांनी सांगितलं कारण


बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात प्रचंड दिरंगाई केल्याने परिस्थिती चिघळली, असा आरोप केला जात आहे. याबाबत बोलताना चित्रा वाघ यांनी म्हटले की, बदलापूरमध्ये घडलेली घटना मनाला वेदना देणारी आहे. चार वर्षांच्या मुलींसोबत घडलेला प्रकार वेदनादायी आहे. मी याबाबत माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात आले होते. माझ्यासोबत असलेले किसन कथोरे गेल्या दोन-तीन दिवसांपासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत पोलीस ठाण्यात होते. याप्रकरणात पोलिसांकडून दिरंगाई घडल्याचे सांगितले जाते. 


पण जेव्हा लहान मुलीची आई तिला पोलीस ठाण्यात घेऊन आली तेव्हा तिला वैद्यकीय चाचणीला पाठवण्यात आले. तिथे चेकअपसाठी किमान तीन-चार तास लागतात. त्यानंतर चिमुरडीला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. ज्या मुलीला अजून शरीराची ओळख नाही, तिच्याकडून वदवून घेणं, तिच्यासोबत नक्की काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी वेळ लागला. मुलींच्या स्टेटमेंटशिवाय गोष्टी पुढे सरकू शकत नव्हत्या. मुलीचा जबाब नोंदवल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर सरकारने शक्य त्या सर्व गोष्टी केल्या, असा दावा चित्रा वाघ यांनी केला.


आणखी वाचा


चिमुकल्या लेकींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं वकीलपत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे येईना, कल्याण कोर्टात काय घडलं?