मुंबई: मनसेने (MNS) या निवडणुकीसाठी अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून रिंगणात उतरवले होते. मात्र, भाजप नेत्यांच्या मनधरणीनंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून (Konkan Padvidhar matadar sangh) माघार घेत भाजपला निवडणुकीसाठी 'सशर्त' पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे.  यानंतर ठाकरेंनी युटर्न घेतल्याच्या बातम्यांना उधाण आले . या नंतर स्वत: अभिजीत पानसेंनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे. आमचा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे, राज ठाकरे बोलले उडी मारा की मारणार, ते बोलले थांबा तर थांबणार, अशी प्रतिक्रिया अभिजीत पानसेंनी दिली.  मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


अभिजीत पानसे म्हणाले,  मी निष्ठावंत राज साहेबांचा सैनिक आहे. मी पदवीधर निवडणूक लढवणार होतो. परंतु देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांना माघार घेण्याची विनंती केली. त्यामुळे निवडणूक लढवत नाही. निरंजन डावखरेंना निवडणुकीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत.


आमचा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष : अभिजीत पानसे


अभिजीत पानसे पुढे म्हणाले, आमचा पक्ष हा आदेशावर चालणारा पक्ष आहे. राज ठाकरे बोलले उडी मारा की मारणार ते बोलले थांबा तर थांबणार. देवेंद्र फडणवीसांच्या विनंतीला मान्य करून माघार घेण्याचा आदेश राज ठाकरेंनी दिला आहे. तो आम्हाला मान्य आहे. या निवडणुकीत बिनशर्थ पाठिंबा द्यायचा की नाही, यावर निर्णय झालेला नाही. निवडणुकीकरता माझी पूर्ण तयारी होती.


मनसेने का घेतली माघार?


कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेच्या अभिजीत पानसेंनी माघार घेतली आहे. राज ठाकरेंची मनधरणी केल्यानंतर मनसेने हा निर्णय घेतला आहे आहे. देवेंद्र फडणवीसांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती. सकाळी भाजपचे आमदार आणि कोकण पदवधीर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी सकाळी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटी दरम्यान कोकण पदवीधर उमेदवारीवरून दोघांमध्ये सखोल चर्चा झाली. भाजपसाठी कोकण पदवीधर मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा असल्याने निरंजन डावखरे यांनी भेट घेतली होती. 


पाठिंबा बिनशर्त की सशर्त?


राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आहे का,यावर सरदेसाई यांनी म्हटले की, असं काही नाही, राजकारणात बऱ्याच गोष्टींचा परिणाम लगेच दिसून येत नाही, काही गोष्टींचा फायदा कालांतराने दिसत असतो. राज ठाकरे मनसेच्या फायद्याचा विचार करुनच निर्णय घेतात, त्यामुळे या निर्णयाचा फायदा काही दिवसांनी दिसून येईल.